सांडपाण्याच्या किरकोळ कारणावरून खडकीत जीवे मारण्याचा प्रयत्न; चार जणांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 06:43 PM2018-02-03T18:43:04+5:302018-02-03T18:46:46+5:30
सांडपाणी दारात येत असल्याच्या कारणावरून खडकी, महादेववाडी येथे भांडण झाले. हे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या दोघांना आरोपींनी धारदार शस्त्राने जखमी केले. शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडली.
पिंपरी : सांडपाणी दारात येत असल्याच्या कारणावरून खडकी, महादेववाडी येथे भांडण झाले. हे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या दोघांना आरोपींनी धारदार शस्त्राने जखमी केले. शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. चार जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहाबाज कुरेशी (वय १९, रा. खडकी) यांनी फिर्याद दिली आहे. अरबाज हनिफ कुरेशी, शाहरूख हनिफ कुरेशी, हनिफ गफूर कुरेशी, तायरा हनिफ कुरेशी (सर्व रा. महादेववाडी, खडकी) अशी आरोपींची नावे आहेत. फिर्यादी शाहबाज कुरेशी यांची आई व चुलती तायरा हनिफ कुरेशी यांच्यामध्ये दारात सांडपाणी येण्याच्या मुद्द्यावरून भांडण झाले. फिर्यादीचा भाऊ मुसेफ कुरेशी व वडिल भांडण सोडविण्यासाठी गेले. त्यावेळी आरोपी अरबाज कुरेशी याने घरातून कोयता आणला. फिर्यादीकडे पाहुन तो म्हणाला, रोजचे नाटक झाले आहे, आज गेम वाजवून हिसाब रोजची किटकिट संपवतो. असे म्हणून त्याने फिर्यादीच्या वडिलांच्या डोक्यात व कपाळावर कोयत्याने वार केले. त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. आरोपी शाहरूख कुरेशी याने हातातील रॉडने तसेच हनिफ कुरेशी यांनी हाताने व लाथा बुक्यांनी मारहाण करून जखमी केले.
खडकी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक व्ही. एस. आजगेकर या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत.