एटीएम मशीन फोडून चोरीचा प्रयत्न; मावळ तालुक्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2021 02:06 PM2021-08-16T14:06:58+5:302021-08-16T14:07:29+5:30
सोमाटणे गावच्या हद्दीत शिरगाव रस्त्यावर ॲक्सिस बँकेचे एटीएम आहे.
पिंपरी : अज्ञात चोरट्याने एटीएम मशीन फोडून चोरीचा प्रयत्न केला. मावळ तालुक्यात सोमाटणे गावाच्या हद्दीत शिरगाव रस्त्यावर शनिवारी (दि. १४) रात्री पावणे दोन ते सकाळी साडेसातच्या दरम्यान हा प्रकार घडला.
सहाय्यक पोलीस फौजदार संजय मनोहरराव घोगरे यांनी या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात शनिवारी (दि. १४) फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमाटणे गावच्या हद्दीत शिरगाव रस्त्यावर ॲक्सिस बँकेचे एटीएम आहे. अज्ञात चोरट्याने या एटीएमच्या मशीन समोरील बाजूच्या लॉकरचे लोखंडी झाकण उघडले. एटीएम मशीनमधून रोख रक्कम बाहेर येण्यासाठी असलेला रोलर तोडून एटीएममधून रक्कम चोरण्याचा प्रयत्न केला.
ॲक्सिस बँकेचे एटीएम ग्रामीण भागात असल्याने त्याच्या सुरक्षिततेबाबत २४ तास हत्यारधारी गार्ड नेमण्याबाबत व अलार्म सिस्टीम बसविण्याबाबत पोलिसांनी सूचना दिल्या आहेत. तसेच अलार्म सिस्टीम बसवून सुरक्षेच्या इतर उपाययोजना करण्याबाबत बँकेस वारंवार लेखी आदेशाने सूचना करूनही बँकेने त्याकडे दुर्लक्ष केले. एटीएमच्या ठिकाणी सुरक्षेबाबत कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत. तसेच हत्यारधारी गार्ड न नेमता एटीएमच्या सुरक्षेबाबत निष्काळजीपणा करून अज्ञात चोरट्यांना चोरी करण्यास अप्रत्यक्षपणे साहाय्य केले आहे, असे फिर्यादीत नमूद केले आहे.