वकिलाला लुटणे पडले महागात, सहा दरोडेखोर जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 03:11 AM2018-04-07T03:11:39+5:302018-04-07T03:11:39+5:30
वकिलाला मारहाण करून लुटणाऱ्या सहा दरोडेखोरांना भोसरी पोलिसांनी अखेर गजाआड केले. त्यांच्याकडून दरोड्यातील पाच लाख ३५ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
भोसरी - वकिलाला मारहाण करून लुटणाऱ्या सहा दरोडेखोरांना भोसरी पोलिसांनी अखेर गजाआड केले. त्यांच्याकडून दरोड्यातील पाच लाख ३५ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
अतुल मुरलीधर नाईक (वय २३, रा. राधानगरी हाऊसिंग सोसायटी, दिघी रोड, भोसरी), आकाश महादेव काळपांडे (वय २४, रा. सावंतनगर, दिघी), गोकूळ कृष्णा निखाडे (वय २२, रा. आळंदी रोड, भोसरी), शुभम बाबूराव तायडे (वय १९, रा. आळंदी रोड, भोसरी), राजकुमार उमाजी डामसे (वय २०, रा. बनकर वस्ती, मोशी), जगदीश दिगंबर इंगळवाड (वय १८, रा. मोई, ता. खेड, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
उत्तर प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, परिमंडल तीनचे पोलीस उपआयुक्त गणेश शिंदे, सहायक पोलीस आयुक्त सतीश पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद कठोरे, पोलीस उपनिरीक्षक काळुराम लांडगे, पोलीस कर्मचारी महादेव धनगर, बाळासाहेब विधाते, समीर रासकर यांनी ही कारवाई केली.
मागील गाडीला ओव्हरटेक करण्यासाठी जागा दिली नाही, या कारणावरून एका वकिलाला अडवून त्याला मारहाण करून लुटल्याचा प्रकार घडला होता. याबाबत वकिलाने भोसरी पोलिसात अज्ञात सहा जणांविरोधात फिर्याद दिली होती. त्यानुसार तपास सुरू असताना पोलिसांना गुप्तहेरांमार्फत संशयास्पद व्यक्तींबद्दल माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी सापळा रचून सहा जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून आठ मोबाईल फोन, सोन्याची चेन, सात हजार ५०० रुपये आणि एक स्विफ्ट कार (एमएच १२, एचएल ८८३२) असा एकूण पाच लाख ३५ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. तसेच हिंजवडी पोलीस ठाण्यातील खंडणीसाठी अपहरण केल्याचा एक गुन्हा उघडकीस आला आहे.