अधिकारीपदासाठी महापालिकेत लिलाव, अर्थकारणाला कंटाळून डॉक्टरांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्याची चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 05:08 AM2017-09-17T05:08:03+5:302017-09-17T05:08:20+5:30
महापालिकेतील आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांनी सत्ताधारी आणि प्रशासनावर गंभीर आक्षेप घेतला आहे. वैद्यकीय अधिकारीपदासाठी लाखोंची बोली लावल्याची, तसेच बढती-बदलीच्या अर्थकारणाला आणि राजकारणाला कंटाळून स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज दिल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे.
पिंपरी : महापालिकेतील आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांनी सत्ताधारी आणि प्रशासनावर गंभीर आक्षेप घेतला आहे.
वैद्यकीय अधिकारीपदासाठी लाखोंची बोली लावल्याची, तसेच बढती-बदलीच्या अर्थकारणाला आणि राजकारणाला कंटाळून स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज दिल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे.
महापालिकेत भाजपाची एकहाती सत्ता आहे. त्यामुळे विधी समितीच्या बैठकीत विद्यामान आरोग्य अधिकारी डॉ. अनिल राय यांच्याऐवजी डॉ. पवन साळवे यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाविरोधात डॉ. अनिल रॉय यांनी न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले आहे. साळवे यांच्यावर तत्कालीन सत्ताधाºयांनी अन्याय केल्याच्या आणि त्यांना न्याय देण्याच्या भावनेने साळवे यांना पद देण्याचा निर्णय विधी समितीने घेतला आहे. चार वर्षांनंतर संबंधित पद काढून घेतल्याने महापालिकेतील बदल्याच्या अर्थकारण आणि राजकारणाविरोधात डॉ. रॉय यांनी आवाज उठविला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल...
सत्ताधीशांचा आणि प्रशासनाचाही आपल्यावर विश्वास नाही. त्यामुळे विदारक परिस्थितीत आपण आरोग्य अधिकारी पदावर राहणे संयुक्तिक वाटत नसल्याचे डॉ. रॉय यांनी स्वेच्छानिवृत्ती अर्जात म्हटले आहे. विशेष म्हणजे हा अर्ज सोशल मीडियामध्ये फिरत आहे.
साडेचार वर्षांनंतर साक्षात्कार
१ जून २०१३ पासून मी आरोग्य वैद्यकीय अधिकारी पदावर कार्यरत असून, चार आयुक्तांसमवेत काम केले. या चारही आयुक्तांनी आपणास दिलेली बढती नियमानुसार असल्याचे राज्य शासन, राष्ट्रीय व राज्य अनुसूचित जाती आयोग, खासगी संस्था, नगरसेवकांना लेखी कळविले. त्याबाबतचा पत्रव्यवहार आजही उपलब्ध आहे. आता साडेचार वर्षांनंतर प्रशासनाला मला दिलेली बढती योग्य नसल्याचा साक्षात्कार कसा झाला? या प्रकरणात आर्थिक देवाणघेवाण झाल्याची धारणा आहे. पदावर असताना माझ्याविरुद्ध कोणतीही तक्रार नसून, सर्व आयुक्तांनी मला गोपनीय अहवालात अत्युत्कृष्ट शेरांकन दिले आहे, असे असताना साडेचार वर्षांनंतर पद काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे, अशी भावना रॉय यांनी प्रशासनास दिलेल्या अर्जात व्यक्त केली.
पदासाठी प्रशासनावर दबाव
डॉ. रॉय यांना पदभार दिल्यानंतर डॉ. साळवे यांनीही आपल्यावर अन्याय झाल्याची भावना व्यक्त करून त्यासाठी लढा दिला होता. प्रशासकीय पातळीवर पत्रव्यवहार केला होता. महापालिकेत राष्टÑवादी काँग्रेसची सत्ता जाऊन भाजपाची सत्ता आल्यानंतर सहा महिन्यांत सत्ताधाºयांनी रॉय यांचा पदभार काढण्याचा निर्णय घेतला आहे. डॉ. साळवे हे खासदार अमर साबळे यांचे निकटवर्तीय असून त्यांच्या नावासाठी भाजपातील एक गट आग्रही होता. तर भाजपातील साबळे विरोधी गटाचा डॉ. रॉय यांच्या नावास पाठिंबा आहे. भाजपातील वरिष्ठ पातळीवरील नेत्यांनी साळवे यांच्या नावाला पसंती दिली.
विधी संशयाच्या भोवºयात
दोनदा विधी समिती तहकुबीनंतर डॉ. साळवे यांचा विषय मंजूर केला. या पदासाठी अर्थकारण झाल्याचा आरोप रॉय यांनी केल्याने विधी समिती संशयाच्या भोवºयात आली आहे. या पदासाठी लाखोंची बोली लावली असल्याची चर्चा आज महापालिकेत होती. तर विधी समितीलाच एवढी रक्कम कशी? यामुळे भाजपाचे महापालिकेतील पदाधिकारी अस्वस्थ झाले आहे. दरम्यान येत्या महासभेत डॉ. साळवे यांना देण्यात येणाºया पदाला अंतिम मंजुरी देण्याचा विषय येणार आहे.