Pimpri Chinchwad | पुण्यात रिक्षाला मीटर चालते, पिंपरी-चिंचवडमध्ये का नाही?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2022 12:52 PM2022-12-10T12:52:51+5:302022-12-10T13:01:24+5:30

या लुटीला जबाबदार कोण?...

auto rickshaw Meter works in Pune why not in Pimpri-Chinchwad traffic police | Pimpri Chinchwad | पुण्यात रिक्षाला मीटर चालते, पिंपरी-चिंचवडमध्ये का नाही?

Pimpri Chinchwad | पुण्यात रिक्षाला मीटर चालते, पिंपरी-चिंचवडमध्ये का नाही?

googlenewsNext

पिंपरी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील रिक्षा स्टँडवर एक रिक्षाचालक ७२ वर्षांच्या ज्येष्ठाला शहरात मीटरप्रमाणे नव्हे तर शेअरिंग सीटने रिक्षा धावत असल्याचे समजावत होता. तर ज्येष्ठ नागरिक मीटरप्रमाणे चला, अशी विनवणी करीत होता. ‘तुमचे म्हणणे बरोबर असले तरी मीटरप्रमाणे रिक्षा शहरात धावणार नाहीत’ असे स्पष्टच रिक्षाचालकाने ज्येष्ठाला सुनावले. १०० रुपये द्या, तुम्हाला चिंचवडमध्ये सोडतो, असा हट्ट रिक्षाचालकाने धरल्याने ज्येष्ठ नागरिकाला गप्प रिक्षात बसावे लागले.

शहरातील ७२ वर्षीय ज्येष्ठाला आलेला हा अनुभव रोज अनेक प्रवाशांना पिंपरी-चिंचवडमध्ये येतो. अघोषित ‘मीटरबंदी’ असल्याचे शहरात नवीन येणाऱ्या प्रवाशांना अनुभवण्यास येते. पुणे शहरात मीटर चालते, मग पिंपरी-चिंचवडमध्ये का नाही, असा प्रश्न या प्रवाशांकडून उपस्थित करण्यात येतो. मात्र, त्यांच्या प्रश्नाचे उत्तर ना रिक्षाचालक देतात, ना वाहतूक प्रशासन.

शहरात बाहेरून रात्री येणाऱ्या किंवा पहाटे शहराच्या बाहेर पडू इच्छिणाऱ्या प्रवाशांकडून काही रिक्षाचालक अव्वाच्या सव्वा भाडे वसूल करत आहेत. प्रवाशांना मीटरप्रमाणे प्रवास करण्याचा अधिकार असतानाही त्यांना भाडे नाकारले जात असल्याने प्रवासी संताप व्यक्त करत आहेत.

या मार्गांवर होते २० रुपयांत वाहतूक

पिंपरीच्या मुख्य चौकातून रिक्षाने प्रवास करायचा असेल तर शेअर रिक्षानेच करावा लागतो. पिंपरी ते भोसरी या सहा किलोमीटरच्या मार्गावर एका प्रवाशाला २० रुपये मोजावे लागतात, तर पिंपरी चौक ते काळेवाडी फाटा या मार्गावरदेखील शेअर रिक्षामध्ये एका प्रवाशाकडून २० रुपये घेतले जातात. पिंपरी ते निगडी या मार्गावरदेखील २० रुपये भाडे आकारले जात आहे.

या लुटीला जबाबदार कोण?

‘लोकमत’च्या प्रतिनिधीने पिंपरी चौकातून रात्री १० च्या सुमारास पाहणी केली. या पाहणीत रिक्षाचालकांना स्वारगेटला येणार का? म्हणून विचारणा केली. स्वारगेटला येणार असल्याचे रिक्षाचालकाने कबूल केले, मात्र मीटरप्रमाणे न येता तब्बल ४०० रुपयांची मागणी केली. तर काही रिक्षाचालक ३५० रुपयांमध्ये येण्यास तयार झाले. मीटरप्रमाणे येण्याविषयी या रिक्षाचालकांना विचारले असता परवडत नसल्याचे उत्तर त्यांनी दिले.

Web Title: auto rickshaw Meter works in Pune why not in Pimpri-Chinchwad traffic police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.