पुणे : अल्पवयीन मुलीसमोर चाळे करणाऱ्या रिक्षाचालकाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 11:24 AM2022-04-27T11:24:26+5:302022-04-27T11:27:51+5:30
पोलिसांनी ४० रिक्षांची तपासणी करून रिक्षाचालकाला अटक केली...
पिंपरी : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीसमोर गैरकृत्य करून तिचा विनयभंग केला. बावधन येथे २२ एप्रिल रोजी दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली. त्यानंतर चालकाने रिक्षाचा ‘लूक’ बदलवून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी ४० रिक्षांची तपासणी करून रिक्षाचालकाला अटक केली.
सचिन देविदास शेंडगे (वय ३३, रा. दापोडी), असे अटक केलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. पीडित १२ वर्षीय मुलीच्या वडिलांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी ही क्लासवरून घरी जात असताना रिक्षाचालकाने पत्ता विचारण्याचा बहाणा करून गैरकृत्य करून मुलीचा विनयभंग केला. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक डाॅ. विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक सागर काटे व राम गोमारे यांच्या पथकांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली.
यात रिक्षाचा अस्पष्ट क्रमांक मिळाला. त्यानुसार ४० रिक्षा तपासल्या. त्यापैकी दापोडी येथील रिक्षाबाबत चौकशी केली. परंतू पोलिसांना रिक्षा ओळखू येऊ नये यासाठी रिक्षाच्या काचेवर रंगीत रेडीयमने आई व चित्र काढले होते. त्यानंतर रिक्षाचालकाची माहिती काढली असता तो मानकर चौक, वाकड येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सोमवारी (दि. २५) मानकर चौक येथून रिक्षासह चालकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याचे सांगितले.
सहायक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनील दहिफळे, सोन्याबापू देशमुख, तपास पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक सागर काटे, राम गोमारे, सहायक फौजदार महेश वायबसे, बंडु मारणे, पोलीस कर्मचारी कुणाल शिंदे, रितेश कोळी, अरूण नरळे, चंद्रकांत गडदे, श्रीकांत चव्हाण, कारभारी पालवे, ओमप्रकाश कांबळे, अमर राणे, दत्ता शिंदे, सुभाष, गुरव, नूतन कोंडे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.