अवजड विद्यापीठांचे विक्रेंद्रीकरण व्हावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 04:16 AM2017-07-31T04:16:39+5:302017-07-31T04:16:39+5:30
राज्यातील विद्यापीठांशी संलग्न असणा-या महाविद्यालयांची संख्या प्रमाणापेक्षा अधिक वाढल्याने ही विद्यापीठे अवजड झाली आहेत.
राज्यातील विद्यापीठांशी संलग्न असणा-या महाविद्यालयांची संख्या प्रमाणापेक्षा अधिक वाढल्याने ही विद्यापीठे अवजड झाली आहेत. त्यामुळेच उशिरा निकाल लागणे, निकालात चुका होण्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. त्यामुळे या अवजड विद्यापीठांचे विक्रेंद्रीकरण करण्याची आवश्यकता आहे; तसेच देशात ‘स्किल कौन्सिल आॅफ इंडिया’ची स्थापना करून, प्रत्येक विद्यार्थ्याला कौशल्य अभ्यासक्रम शिकविण्याची गरज आहे, असे सिंबायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी आज वाढदिवसानिमित्त ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.डॉ. मुजुमदार म्हणाले, ‘‘मुंबई विद्यापीठाच्या उत्तरपत्रिका तपासणीबरोबरच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील निकालामध्ये चुका झाल्या असल्याची माहिती समोर आली आहे; मात्र यास केवळ कुलगुरूंना दोष देऊन चालणार नाही; कारण राज्यातील सर्वच विद्यापीठांशी संलग्न असणाºया महाविद्यालयांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे राज्यातील विद्यापीठे अवजड झाली आहेत. लाखो विद्यार्थ्यांची हजारो विषयांची परीक्षा घेऊन त्यांचे निकाल जाहीर करण्याचे काम सध्या विद्यापीठांना करावे लागत आहे. त्यामुळे पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठासारख्या मोठ्या विद्यापीठांचे विभाजन करून उपकेंद्र स्थापन करणे गरजेचे आहे. माजी कुलगुरू डॉ. राम ताकवले यांनी दिलेल्या अहवालाचा विचार करून शासनाने आवश्यक पाऊले उचली पाहिजेत.’’
सर्वच परदेशी विद्यार्थी गुणवत्तापूर्ण असतात असे नाही; मात्र सिंबायोसिसमध्ये प्रवेश घेणाºया परदेशी विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक दिसून येते; कारण परदेशी विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेत संवाद साधण्याचे मार्गदर्शन करण्यापासून विविध अभ्यासक्रमाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते. त्यांच्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. पुण्यासह, महाराष्ट्राच्या व भारताच्या इतिहासाची ओळख करून दिली जाते, असे मुजुमदार यांनी स्पष्ट केले.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शैक्षणिक क्षेत्राच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचे दिसून येते; परंतु सध्या केवळ पारंपरिक पदवी अभ्यासक्रमाचे शिक्षण देऊन चालणार नाही. देशातील प्रत्येकाला कौशल्य अभ्यासक्रमाची गरज आहे. त्यामुळे यापुढील काळात कौशल्य विद्यापीठांची स्थापना केली पाहिजे. त्याचप्रमाणे मेडिकल कौन्सिलप्रमाणे देशात ‘स्किल कौन्सिल आॅफ इंडिया’ची स्थापना करून, देशात कौशल्य अभ्यासक्रमांना चालना देण्याची आवश्यकता आहे.
भारतात संशोधनाला वाहून घेणाºया काही संस्था आहेत. प्रत्येक शैक्षणिक संस्थेत संशोधन झाले पाहिजे; मात्र सद्य:स्थितीत विद्यापीठ व महाविद्यालयांची संशोधनापासून फारकत झाल्याचे दिसून येते; परंतु अनेक वर्षांपासून देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नापैकी ६ टक्के खर्चही शिक्षणावर केला जात नाही. देशाच्या विकासात संशोधनाचा महत्त्वाचा वाटा आहे. त्यामुळे संशोधनावर अधिक भर देण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.
हार्वर्ड, केंब्रिज विद्यापीठामध्ये नोबेल पारितोषिक विजेते शिक्षक अध्यापनाचे काम करतात, असे नमूद करून मुजुमदार म्हणाले की, देशातील अध्यापन पद्धतीतही सुधारणा गरजेची आहे. प्राथमिक शिक्षकांना डी.एड., तर माध्यमिक शिक्षकांना बी. एड. अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो; तसेच महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या अध्यापनातील सुधारणेसाठी त्यांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे.
प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात दोन दिवस महत्त्वाचे असतात. एक म्हणजे, व्यक्ती जन्माला येतो तो दिवस आणि दुसरा आपण का जन्माला आलो, याचा अर्थ त्याला उमजतो तो दिवस. माझ्यासाठी दुसरा दिवस महत्त्वाचा आहे. मी वयाची ८२ वर्षे पूर्ण करून, ८३ व्या वर्षात पदार्पण करीत आहे, ‘वसुधैव कुटुंबकम् ’हा विचार उराशी बाळगूण कामास सुरुवात केली. परदेशी विद्यार्थ्यांसाठी सिंबायोसिस सांस्कृतिक केंद्र स्थापन केले. या विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले. सांस्कृतिक केंद्राचे पुढे एका शैक्षणिक संस्थेत आणि आता आंतरराष्ट्रीय विद्यापीठात रूपांतर झाले. त्यामुळे मी का जन्माला आलो, याचा अर्थ मला प्राप्त झाला आहे, असेही मुजुमदार म्हणाले.