साडेतीन हजार विद्यार्थ्यांना बक्षीस, महापालिकेचा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 07:07 AM2017-11-06T07:07:07+5:302017-11-06T07:07:16+5:30
दहावी व बारावी परीक्षेत ८० टक्क्यांपेक्षा जास्त गुण संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात येणार आहे. सुमारे तीन हजार ६०२ विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात येणार आहेत.
पिंपरी : दहावी व बारावी परीक्षेत ८० टक्क्यांपेक्षा जास्त गुण संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात येणार आहे. सुमारे तीन हजार ६०२ विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात येणार आहेत. त्यासाठी चार कोटी ४१ लाख रुपये खर्च होणार आहेत.
स्थायी समिती सभेत विषय मंजूर केला. स्थायी समिती सभापती सीमा सावळे म्हणाल्या, ‘‘महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागांतर्गत विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. या योजनेंतर्गत महापालिका हद्दीत वास्तव्य असणाºया, तसेच महापालिकेची विद्यालये वगळता इतर कोणत्याही विद्यालयात शिक्षण घेणाºया आणि महापालिका हद्दीबाहेरील शाळेत शिक्षण घेत असलेल्या दहावी-बारावीतील ८० टक्क्यांपेक्षा जादा गुण संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसाची रक्कम दिली.
२० जुलै २०१७ रोजी महापालिका सभेत मूळ योजनेत दुरुस्ती करून विद्यार्थ्यांच्या बक्षीस रकमेत वाढ केली. त्यानुसार दहावीतील ८० ते ९० टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी १० हजार रुपये, दहावीतील ९० टक्क्यांपेक्षा जादा गुण संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी १५ हजार रुपये, तसेच बारावीत ८० टक्क्यांपेक्षा जादा गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी १५ हजार रुपये बक्षीस देण्यास मान्यता दिली.
सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाकरिता दहावी व बारावीतील ८० टक्क्यांपेक्षा जास्त गुण संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यासाठी अर्ज मागविले होते. एकूण चार हजार २१९ विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले. अर्जांच्या तपासणीत तीन हजार ६०२ अर्ज पात्र ठरले, तर ६१७ अर्ज अपात्र ठरले आहेत.
पात्र ठरलेल्या तीन हजार ६०२ विद्यार्थ्यांना मंजूर धोरणाप्रमाणे चार कोटी ४१ लाख पाच हजार रुपये बक्षीस रक्कम देण्यात येणार आहे. सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात ‘दहावी व बारावीतील ८० टक्क्यांपेक्षा जास्त गुण संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस रक्कम देण्याबाबत’ या उपलेखाशीर्षावर सात कोटींची तरतूद असून, सहा कोटी ८१ लाख ४० हजार रुपये शिल्लक आहेत. त्यामधून हा खर्च करण्यात येणार आहे.