हेल्मेट न घालणाऱ्या वाहनचालकांना तिळगुळाच्या हेल्मेटने जनजागृती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 06:51 PM2020-01-15T18:51:23+5:302020-01-15T18:59:23+5:30
रस्ता सुरक्षा अभियान : अपघाताची भीती बसण्यासाठी अपघातग्रस्त वाहनाची मांडणी...
चिंचवड: उप प्रादेशिक परिवहन विभाग व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमाने ३१ वे रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रम राबविण्यात येत आहे. वाहन चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे व अपघाताच्या घटना टाळाव्यात यासाठी विशेष जनजागृती अभियानाची सुरवात चिंचवड मधील चापेकर चौकातून करण्यात आली.
वाहन चालकांना वाहन चालविताना नियमांचे पालन न केल्यास होणाऱ्या अपघाताचे गांभीर्य लक्षात यावे यासाठी चौकात अपघात ग्रस्त वाहन ठेवण्यात आले आहे. या वाहनाची अपघातामुळे झालेली अवस्था पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत.
पुणे-सोलापूर महामार्गावर शीट बेल्ट न लावल्यामुळे या वाहनातील दोन जणांचा मृत्यू झाला तर दोन नायबंदी झाले आहेत.या बाबत ची माहिती असणारा फलक या ठिकाणी लावण्यात आले आहेत.याच चौकात हेल्मेट न घालणाऱ्या वाहनचालकांना तिळगुळ असणारे हेल्मेट घालण्यात आले. दंडात्मक कारवाई न करता त्यानां स्वतःची व आपल्या परिवाराची काळजी घेण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.याप्रसंगी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील,सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सोबोध मेडशीकर,सचिन विधाते,विकास माळवे,भालचंद्र कुलकर्णी,अजय कराळे, प्रवीण खेडकर,सिद्धाराम पांढरे,अनुश्री केंद्रे, अंजली पाथरे, गीतांजली काळे, गौरी रासकर,चिंचवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक भीमराव शिंगाडे. वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक खंडेराव खैरे यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
वाहन चालकांना शिस्त लागावी यासाठी नियम न पाळणाऱ्या वाहन चालकांना तिळगुळाचे वाटप करून मार्गदर्शन करण्यात आले.जे वाहन चालक हेल्मेट घालून जात होते त्यानां सन्मान चिन्ह,गुलाब पुष्प व तिळगुळ देऊन सन्मानित करण्यात आले.या साठी पारंपरिक वेशभूषा करीत स्वायत्त श्रमिक महिला संघाच्या निर्मला जगताप, अंजली ब्रह्मे,अनिता भाकरस,निरजा देशपांडे,किमया खांदवे,उदय वाडेकर,संतोष शेटे यांनी सहकार्य केले.