पाालिकेची रोपवाटिका मरणासन्न अवस्थेत
By admin | Published: April 26, 2017 03:54 AM2017-04-26T03:54:54+5:302017-04-26T03:54:54+5:30
महापालिकेच्या दोन मोठ्या रोपवाटिका असूनही गेल्या काही वर्षांत महापालिकेच्या उद्यान विभागाने विविध रोपे खरेदी
रावेत : महापालिकेच्या दोन मोठ्या रोपवाटिका असूनही गेल्या काही वर्षांत महापालिकेच्या उद्यान विभागाने विविध रोपे खरेदी करण्यासाठी तब्बल ६ कोटी रुपये खर्च केले आहेत. रोपवाटिका असूनही कोट्यवधींची रोपे बाहेरून खरेदी करावी लागत असतील, तर रोपवाटिकांचा उपयोग काय, असा संतप्त सवाल नागरिक करीत आहेत. शिवाय या रोपवाटिका चालविण्यासाठी तसेच रोपे खरेदी करण्यासाठी वापरण्यात येणारे पैैसे म्हणजे सामान्य नागरिकांच्या कराची उधळपट्टीच आहे.
या रोपवाटिकांची पाहणी केली असता प्राधिकरणमधील रोपवाटिकेचा परिसर हा मोठा आणि विस्तृत आहे. मात्र, वाटिकेच्या व्यवस्थापन तसेच देखभालीमध्ये सुसूत्रता अजिबात नसल्याचे पाहायला मिळाले. देखभालीअभावी या रोपवाटिकेतील सुमारे ६० टक्क्यांपेक्षा जास्त रोपे जळून गेली आहेत. या रोपवाटिकेत सुमारे अंदाजे १५ ट्रक माती शेड गोडाऊनमध्ये पडून आहे. या मातीचा उपयोग वापर रोपे बनवण्यासाठी होऊ शकतो.
या रोपवाटिकेत हजारो मातीच्या नवीन कुंड्या धूळ खात पडून आहेत. त्यात माती टाकून रोपांची निर्मिती करणे शक्य आहे. मात्र व्यवस्थापनाच्या उदासीनतेमुळे रोपांची निर्मिती करणेच बंद झाले आहे.
या रोपवाटिकेच्या दुरवस्थेला जबाबदार कोण? तसेच बाहेरून रोपे खरेदीकरिता मुद्दाम या वाटिकेची दुरवस्था केली तर नाही ना, असा सवाल प्राधिकरण नागरी सुरक्षा समितीने केला आहे.
तसेच वाटिकेच्या या दुरवस्थेची आयुक्तांनी सर्व बाजूंनी चौकशी करावी, दक्षता विभागाने त्वरित दखल घेऊन रोपवाटिकेला भेट द्यावी व दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी प्राधिकरण नागरी सुरक्षा समितीने केली आहे.
प्राधिकारण नागरी सुरक्षा समितीच्या पर्यावरण तज्ज्ञांनी याबाबत निरीक्षण केले आहे. यामध्ये समितीच्या सुनील चौगुले, विजय मुनोत, आणि समिती अध्यक्ष विजय पाटील यांनी रोपवाटिकेची पाहणी केली असता सदरच्या बाबी निदर्शनास आल्या. सदरची रोपवाटिका पुनर्जीवित होऊ शकते असेही
नमूद केले. त्यासाठी महापालिकेने त्वरित पावले उचलावीत म्हणजेच जून २०१७ पर्यंत प्राधिकरणातील रोपवाटिका पुन्हा पुनर्जीवित होऊ शकेल. (वार्ताहर)