हरणटोळ सापांमध्ये आढळले प्रतिजैविकांना दाद न देणारे जीवाणू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 09:38 AM2021-05-25T09:38:36+5:302021-05-25T09:39:17+5:30
उत्तर-पश्चिम घाटात आढळणाऱ्या हरणटोळ सापामध्ये नव्या जीवाणूंचा शोध पुणे आणि चंदीगढमधील शास्त्रज्ञांनी लावला आहे.
पिंपरी : उत्तर-पश्चिम घाटात आढळणाऱ्या हरणटोळ सापामध्ये नव्या जीवाणूंचा शोध पुणे आणि चंदीगढमधील शास्त्रज्ञांनी लावला आहे. नव्याने आढळलेले जीवाणू प्रतिजैविकांना दाद देत नसल्याने अशा सापांचा दंश जीवावर बेतू शकतो, अशी भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. गोवा ते कर्नाटक प्रांतात केलेल्या संशोधनात सावेजिया वंशातील आणि प्लॅनोकोकासिया कुटुंबातील एसएन ६ आणि एसएन ६ बी या दोन नवीन प्रजातींचा शोध लागला आहे. त्या प्रजातींना सर्पेंटिस स्पेसिस नोव्हेल हे नाव दिले आहे. पुण्यातील नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स (जुन्नर) चे श्री शिवछत्रपती महाविद्यालय, चंदीगढमधील सीएसआयआर इन्स्टिट्यूट ऑफ मायक्रोबियल टेक्नॉलॉजी या संस्थांनी हे संशोधन केले आहे. हे संशोधन स्वित्झर्लंडमधील प्रसिद्ध ‘स्प्रिंजर नेचर जर्नल अँटनी लिऊवेनहोक’ या जर्नलमध्ये नुकताच प्रसिद्ध झाला आहे.
नव्याने शोधलेले प्लॅनोकोकासी कुटुंबातील जीवाणू बहुतांश प्रतिजैविकांना दाद देत नाहीत. सर्पदंशाच्या जखमेवर नियंत्रण ठेवण्यासाठी अँपिसिलिन, पेनिसिलिन, व्हॅनकोमायसीन अशी विविध प्रतिजैविके दिली जातात. मात्र नवीन जीवाणू त्यांना दाद देत नाहीत. ही चिंतेची बाब आहे.
डॉ. प्रमोद माने, संशोधक