‘फिल्डिंग’ लावूनही बिघडली बदल्यांची गणिते
By admin | Published: May 6, 2016 05:50 AM2016-05-06T05:50:53+5:302016-05-06T05:50:53+5:30
अमुक ठिकाणीच बदली व्हावी, जाण्या-येण्यासाठी सोपे पडावे, कामाचा ताण कमी असावा यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांमार्फत
पिंपरी : अमुक ठिकाणीच बदली व्हावी, जाण्या-येण्यासाठी सोपे पडावे, कामाचा ताण कमी असावा यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांमार्फत बदलीसाठी ‘फिल्डिंग’ लावली होती. मात्र, आयुक्तांची अचानक बदली झाल्याने बदलीसाठी तयारीत असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांंचे गणित बिघडले आहे.
एप्रिल आणि मे हे महिने म्हणजे बदल्यांचा हंगाम समजला जातो. या महिन्यात अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या होतात. मनाप्रमाणे बदली व्हावी, अशी अनेकांची इच्छा असते, तर काहींना बदलीच नको असते. महापालिकेतील अनेक पदाधिकाऱ्यांचे नातेवाईक विविध विभागांत नोकरीस आहेत. पदाधिकाऱ्यांचे नाव पुढे करून कामाला देखील ‘ठेंगा’ दाखवीत असल्याची उदाहरणे आहेत. तसेच बदल्यांच्या वेळीही अशा कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार बदल्या होतात. सध्यांच्या बदल्यांच्या हंगामात इच्छित ठिकाणी बदली करवून घेण्यासाठी विविध विभागांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांमार्फत ‘फिल्डिंग’ लावली होती. त्यातच आता महापालिका निवडणुका जवळ आल्याने पदाधिकाऱ्यांनीदेखील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्यांकडे लक्ष घातले होते. एखादा अधिकारी, कर्मचाऱ्याचा निवडणुकीत फायदा होऊ शकतो, यासाठीही पदाधिकाऱ्यांकडून बदल्यांचे नियोजन केले होते. त्यानुसार पदाधिकाऱ्यांनी ‘सेटिंग’ही लावले होते.
मात्र, आयुक्त राजीव जाधव यांची बदली झाल्याने अनेकांची गणितेच बिघडली आहेत. आयुक्तांच्या बदलीमुळे त्यांच्या मनसुब्यांवर पाणी फिरले असल्याची जोरदार चर्चा पालिका वर्तुळात आहे. (प्रतिनिधी)
पदाधिकाऱ्यांकडे हेलपाटे
अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी ठाण मांडून बसणारयांची संख्याही अधिक आहे. यामुळे कामकाजावर देखील काही प्रमाणात परिणाम होतो. मात्र, संबंधित कर्मचारी एखाद्या पदाधिकाऱ्याशी संबंधित असल्याने अशा कर्मचाऱ्यांच्या बदलीकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी राहिल्यानंतर काही तरी फायदा असल्याने त्या ठिकाणाहून बदली नको असते. बदली टाळण्यासाठी पदाधिकाऱ्यांकडे हेलपाटे मारण्याचे प्रकारही घडतात.
कर्मचाऱ्यांची मानसिकता नाही
शासनाच्या इतर संस्थांमध्ये काम करीत असताना एका तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यात, तर कधी इतर जिल्ह्यांतही बदली केली जाते. त्यासाठीची तयारीही कर्मचारी ठेवतात. तर महापालिकेत काम करीत असताना बदली करायची असल्यास महापालिका हद्दीअंतर्गतच केली जाते. केवळ एखादा विभाग बदलू शकतो. फार फार तर येण्या-जाण्यासाठी दोन-तीन किलोमीटर अंतर वाढू शकते. तरीही बदलीसाठी कर्मचाऱ्यांची मानसिकता नसते. बदली रद्दसाठी हालचाली केल्या जातात.