आकुर्डीतील बजाज आॅटो कामगारांचे उपोषण मागे; प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 06:51 PM2018-02-03T18:51:56+5:302018-02-03T18:56:33+5:30
बजाज आॅटो कंपनी व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांची विश्वकल्याण कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी कामगार प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाली, त्यामुळे विश्वकल्याण कामगार संघटनेचे अध्यक्ष दिलीप पवार यांनी पाचव्या दिवशी शुक्रवारी उपोषण मागे घेतले.
पिंपरी : बजाज आॅटो कंपनी व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांची विश्वकल्याण कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी कामगार प्रश्नांवर चर्चा झाली. कामगारांच्या प्रश्नावर तोडगा काढण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. त्याचबरोबर प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन मिळाले, त्यामुळे विश्वकल्याण कामगार संघटनेचे अध्यक्ष दिलीप पवार यांनी पाचव्या दिवशी शुक्रवारी उपोषण मागे घेतले.
आकुर्डीत विश्वकल्याण कामगार संघटनेचे दिलीप पवार यांनी २९ जानेवारीपासून काही कामगारांसह उपोषण सुरू केले होते. बडतर्फ कामागारांना पुन्हा रुजू करून घ्यावे. तसेच प्रलंबित वेतन करार करावा, या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. कंपनीच्या व्यवस्थापन प्रतिनिधींनी बडतर्फ कामगारांच्याबाबत फेरविचार करू तसेच प्रलंबित वेतन कराराच्या मुद्यावर समन्वयाने तोडगा काढला जाईल, असे आश्वासन कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले. आकुर्डी व चाकण येथील कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्याने श्रमिक एकता महासंघाचे सल्लागार मारूतराव जगदाळे यांनी पवार यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर पवार यांनी उपोषण मागे घेतले.
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नगरसेविका सुलभा उबाळे, मारूती भापकर, नगरसेवक केशव घोळवे, अरविंद श्रोती, नागरी हक्क समितीचे अध्यक्ष संतोष कणसे, जनरल सेक्रेटरी महेश खानापूरकर आदी उपस्थित होते. दरम्यान, चाकण व आकुर्डी प्रकल्पातील कामगारांनी कंपनी व्यवस्थापनाने मागण्या मान्य केल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.