बेकरी व्यावसायिक स्वच्छतेबाबत उदासीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 02:57 AM2018-12-11T02:57:06+5:302018-12-11T02:57:20+5:30
विक्रेत्यांकडून अन्नसुरक्षा मानके धाब्यावर
भोसरी : भोसरी परिसरातील अनेक बेकरी व्यावसायिकांना स्वच्छतेचे वावडे असल्याचे पाहायला मिळत आहे. बेकरीचे उत्पादन घेण्यापासून ते विक्रेत्यापर्यंत माल पोहचविण्यापर्यंत स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जात आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा हा प्रकार असून, अन्न व औषध प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष झाले आहे.
शहरात बेकरीचा माल तयार करणाऱ्या असंख्य भट्ट्या आहेत. या भट्ट्यांमध्ये तयार होणारा बेकरीचा माल शहरातील विविध बेकºयांमध्ये विक्रीसाठी पाठवला जातो. मात्र, येथे तयार होणाºया उत्पादनाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. भट्टी परिसरात मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता पसरलेली असते. अन्नपदार्थ उघड्यावर टाकलेले असतात. उत्पादित मालदेखील उघड्यावरच असतो. कायद्यानुसार बेकरीच्या पदार्थांचे उत्पादन केले जात असलेल्या ठिकाणी कामगारांना राहता येत नाही. मात्र, बहुसंख्य कामगार बेकरीमध्येच राहतात. एवढेच नव्हे, तर अनेक बेकºया दाट वस्तीच्या ठिकाणी आहेत. त्या ठिकाणी धुराडे व इतर गोष्टी पाळल्या जात नाहीत.
अनेक बेकºयांमध्ये विक्रीसाठी ठेवलेला माल हा अत्यंत निकृष्ट प्रतीच्या पदार्थांपासून बनविलेला असतो. मात्र, ग्राहक त्या बाबतीत अनभिज्ञ असतात. विक्री करण्यात येणाºया अन्नपदार्थांबाबत प्रशासनाने नियमावली तयार केली आहे. मात्र, अनेक बेकरी उत्पादक जास्त पैसे मिळवण्याच्या हव्यासापोटी निकृष्ट दर्जाच्या पदार्थांपासून बेकरीचा माल तयार करून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळत आहेत. बेकºयांवर अन्नसुरक्षा मानदे कायद्यांतर्गत अन्नसुरक्षेच्या दृष्टीने बेकरी व्यावसायिकांना अनेक नियम घालून देण्यात आले आहेत. मात्र, ते धाब्यावर बसविले जात आहेत.
उत्पादित बेकरी माल अस्वच्छ अशा टेम्पोंमधून पोहचविला जातो. माल उतरविणारे कामगारही मालाशेजारी टेम्पोत बसलेले असतात. माल उतरविताना जागा मिळेल तेथे माल ठेवला जातो. त्यानंतर दुकानात माल पोहचल्यानंतर विक्रेतेदेखील स्वच्छतेबाबत फारशी काळजी घेत नाहीत. एलईडी दिव्यांच्या झगमगाटामध्ये वरकरणी दुकाने, बेकºया सजविल्या आहेत. मात्र, आतमध्ये भयानक परिस्थिती आहे. बेकरी उत्पादन बनविण्यापासून ते विक्रीपर्यंतचा प्रवास अस्वच्छतेच्या मार्गाने होत आहे. अन्न व औषध प्रशासन, तसेच महापालिकेच्या आरोग्य विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, अशी मागणी होत आहे.