बावधनमध्ये बालाजी रावांच्या ‘बर्थ डे’ पार्टीत रात्रभर धागडधिंगा, रहिवाशांना मनस्ताप
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2024 11:24 AM2024-12-11T11:24:55+5:302024-12-11T11:25:24+5:30
पार्टीसाठी ध्वनियंत्रणा लावण्यासाठी पोलिसांनी परवानगी नाकारली असूनही रात्रभर डीजेचा दणदणाट, लेझरच्या तीव्र दिव्यांचा शो सुरू होता
पिंपरी : वेंकीज ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक बालाजी राव यांच्या वाढदिवसानिमित्त बावधन येथील कोकाटे वस्तीत रविवारी (दि. ८) रात्रभर पार्टीच्या नावाखाली धागडधिंगा सुरू होता. प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांचा कॉन्सर्ट, डीजेचा दणदणाट आणि दारूची रेलचेल असलेली पार्टी सोमवारी (दि. ९) पहाटेपर्यंत सुरू होती. यामुळे आसपासच्या रहिवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. नागरिकांनी तक्रार केल्याने बावधन पोलिसांनी पार्टीच्या आयोजकावर गुन्हा दाखल केला आहे.
आदिनाथ संभाजी मते (रा. वेंकटेशा हाऊस, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आयोजकाचे नाव आहे. सार्वजनिक शांततेचा भंग, ध्वनिप्रदूषण, पर्यावरण संरक्षण अधिनियम याअंतर्गत पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
वेंकीज ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक बालाजी राव यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी कोकाटे वस्तीतील मैदानावर पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. पार्टीसाठी ध्वनियंत्रणा लावण्यासाठी मते याने पोलिसांकडे परवानगी मागितली होती. मात्र, पोलिसांनी परवानगी नाकारली, तरीही पार्टीचे आयोजन करून तेथे डीजेचा दणदणाट, लेझरच्या तीव्र दिव्यांचा शो सुरू होता. सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन आणि त्यांचा मुलगा शिवम महादेवन यांच्या गाण्यांचा कॉन्सर्टही झाला. रविवारी रात्री आठच्या सुमारास सुरू झालेली पार्टी सोमवारी पहाटेपर्यंत सुरू होती. यामुळे आसपासच्या रहिवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.
नागरिकांची पोलिस ठाण्यात धाव
पार्टीची जागा असलेले मैदान म्हणजे राखीव वनक्षेत्र आहे. अनेक वन्य जिवांचा अधिवास तेथे आहे. या परिसरातच ‘एनडीए’ आहे. असे असतानाही येथे पार्टी कशी होऊ शकते, असा प्रश्न उपस्थित करत नागरिकांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली.
बावधन पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढदिवसानिमित्त पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. संबंधित आयोजकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बावधन सिटिझन फोरम यांनी तक्रार केली असून पोलिसांनी ‘सुमोटो’ गुन्हा दाखल केला आहे. यात आणखी कोणी आयोजक आहेत का, याचा तपास सुरू आहे. तपासाअंती अन्य कोणी दोषी आढळून आल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल. - विशाल गायकवाड, पोलिस उपायुक्त