कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
By नारायण बडगुजर | Published: May 5, 2024 10:28 PM2024-05-05T22:28:19+5:302024-05-05T22:29:10+5:30
उपचारादरम्यान निगडी येथे रविवारी (५ मे) झाला मृत्यू
नारायण बडगुजर, लोकमत न्यूज नेटवर्क, पिंपरी: कर्तव्यावर असलेल्या पोलीस अंमलदाराला हृदविकाराचा त्रास झाला. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. निगडी येथे रविवारी (दि. ५) ही घटना घडली. बाळासाहेब महालींग नंदुर्गे (वय ३८), असे मृत्यू झालेल्या पोलिस अंमलदाराचे नाव आहे. त्यांच्या मागे पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे.
बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील करंजी हे नंदुर्गे यांचे मूळ गाव आहे. पोलिस नाईक नंदुर्गे हे निगडी पोलिस ठाण्यात नेमणुकीस होते. ते शनिवारी (दि. ४) रात्री नऊच्या सुमारास कामावर गेले. ‘डायल ११२’ हेल्पलाइनवर ते कर्तव्य बजावत होते. दरम्यान, रविवारी (दि. ५) सकाळी सहाच्या सुमारास छातीत दुखू लागल्याने व श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना प्राथमिक उपचारासाठी निगडी येथील रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारांसाठी त्यांना थेरगाव येथील रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचारा दरम्यान रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.
शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार
बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील करंजी हे नंदुर्गे यांचे मूळ गाव आहे. नंदुर्गे हे कर्तव्य बजावत असताना त्यांना हृदयविकाराचा त्रास झाला. यात त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे करंजी या मूळगावी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.