पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत बाळासाहेबांची शिवसेना गट भाजपबरोबर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2022 11:44 AM2022-12-09T11:44:26+5:302022-12-09T11:45:43+5:30
चिंचवड ऑटो क्लस्टर येथे बाळासाहेबांची शिवसेनेचा पदाधिकारी नियुक्ती मेळावा बुधवारी झाला...
पिंपरी : आगामी महापालिका निवडणुकीत भाजपबरोबर राहण्याचे शिवसेनेचे (बाळासाहेबांची) धोरण ठरले आहे. त्यामुळे कोणाविरोधात मनात राग न ठेवता काम करीत राहा, महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आवाहन खासदार श्रीरंग बारणे यांनी केले आहे. चिंचवड ऑटो क्लस्टर येथे बाळासाहेबांची शिवसेनेचा पदाधिकारी नियुक्ती मेळावा बुधवारी झाला. त्या वेळी ते बोलत होते.
बारणे म्हणाले, ‘निवडणुका येतात-जातात. मात्र, सामान्यांची कामे करण्यासाठी पक्षप्रमुखांची ताकद नेत्यांना मिळाली पाहिजे. ती यापूर्वी मिळाली नाही. तरीही कोणाबाबत द्वेष, राग नाही. आता बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपची युती आहे. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे पाईक म्हणून काम करत आहोत. शिवसेनेने पूर्वीपासून राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात संघर्ष केला. लोकसभा, विधानसभा निवडणूक भाजपसोबत युतीत लढलो. नागरिकांनी एकभावनेने मतदान केले, परंतु लोकांची भावना सोडून राष्ट्रवादीसोबत काम करावे लागले. हे मान्य नव्हते. हीच बाब पक्षप्रमुख यांच्या निदर्शनास आणून दिली, परंतु दखल घेतली नाही. त्यामुळे उद्रेक झाला. फूट पडली.
आगामी महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका पूर्ण ताकदीनिशी लढायच्या आहेत. भाजपच्या पदाधिकाऱ्यांसमवेत समन्वयाने काम करावे. भाजपसोबत धोरण ठरले आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून प्रलंबित प्रश्न सोडविले जातील.