भाजपा-शिवसेनेत जुंपली, चिंचवडमध्ये नवीन गृहप्रकल्पांना बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 03:27 AM2018-06-16T03:27:25+5:302018-06-16T03:27:25+5:30

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील नवीन बांधकामांना बंदी घालण्याचा ठराव भाजपाने केला आहे. त्यावरून भाजपाचे नेते आणि शिवसेना नेत्यांमध्ये शुक्रवारी चांगलीच जुंपली.

Ban on new homes in Chinchwad | भाजपा-शिवसेनेत जुंपली, चिंचवडमध्ये नवीन गृहप्रकल्पांना बंदी

भाजपा-शिवसेनेत जुंपली, चिंचवडमध्ये नवीन गृहप्रकल्पांना बंदी

Next

पिंपरी - चिंचवड विधानसभा मतदारसंघातील नवीन बांधकामांना बंदी घालण्याचा ठराव भाजपाने केला आहे. त्यावरून भाजपाचे नेते आणि शिवसेना नेत्यांमध्ये शुक्रवारी चांगलीच जुंपली.
‘‘वाकडला कलाटेबंधूंचे पाण्याचे टँकर आहेत. दादागिरी करण्यातच त्यांच्या पिढ्या गेल्या आहेत. त्यामुळेच बिल्डरधार्जिण्यांना पोटशूळ उठला आहे,’’ असा आरोप आमदार आणि भाजपा शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी केला, तर चिंचवड मतदारसंघ कोणाची जहागिरी नाही. आमदारांनी दहशतीबाबत बोलणे हाच विनोद आहे, असे प्रत्युत्तर शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी दिले आहे.
नवीन बांधकामांना बंदी घालण्याचा ठराव भाजपाने केला आहे. त्यात फक्त चिंचवडचाच समावेश असल्याने राजकीय वातावरण तापले आहे. विरोधकांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे. बिल्डरांकडून फंड वसुलीसाठी हे धोरण अवलंबल्याची टीका विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केली होती. त्या आरोपांना भाजपाने शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले. त्यानंतर राहुल कलाटे यांनीही आरोप केले.

दादागिरी करण्यात कलाटे बंधूंच्या पिढ्या गेल्या : लक्ष्मण जगताप
गेल्या दहा वर्षांत चिंचवडला बांधकामे वाढली आहेत. त्याचा ताण सुविधांवर येत आहे. नागरिकांना दरडोई १३५ लिटर पाणी मिळणे आवश्यक आहे. पाण्याची कमतरता भासू नये. यामुळेच मोठ्या गृहप्रकल्पांना परवानगी न देण्याचा निर्णय घेतला आहे. जनतेचे हित डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय आहे. आरोप करणारे बांधकाम व्यावसायिकांना ब्लॅकमेल करत होते. ठेकेदाराला, महापालिका कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करतात. त्यांनी आजपर्यंत दादागिरी केली आहे. त्यांच्या पिढ्याच दादागिरी करण्यात गेल्या आहेत. भाजपाला फंडाची गरज नाही. प्रभागातील आरक्षणाचे ताबे पालिकेला देत नाहीत. अपयश झाकण्यासाठी बेछूट आरोप करून सवंग प्रसिद्धी मिळवितात, अशी टीका आमदार लक्ष्मण जगताप यांनी केली.

आमदारांनी दहशतीविषयी बोलणे मोठा विनोद : राहुल कलाटे
वाकड येथील विकासकामांच्या भूमिपूजनानंतर आमदार बिथरले आहेत. शिक्षणाचा अभाव आहे. आमदार झाल्यावर ते बारावी पास झाले आहेत. व्हीजन नसल्याने कसलेही निर्णय घेत आहेत. एका मतदारसंघापुरती बंदी घालणे चुकीचे आहे. आमदारांनी दहशतीबाबत बोलणे म्हणजे हा मोठा विनोद आहे. दहशत म्हणजे काय असते हे देवकर, शितोळे यांना विचारले तर बरे होईल. माझा पाण्याचा टँकर असल्याचे आमदारांनी सिद्ध करून दाखवावे. ज्याची जास्त दहशत त्याला आमदारांकडून महत्त्वाचे पद दिले जाते, असा आरोप राहुल कलाटे यांनी केला.

Web Title: Ban on new homes in Chinchwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.