Talegaon-Chakan Road: तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गावर अवजड वाहतुकीला 'या' वेळेत बंदी
By नारायण बडगुजर | Updated: August 4, 2024 18:05 IST2024-08-04T18:04:23+5:302024-08-04T18:05:27+5:30
वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी तसेच अपघातांना प्रतिबंध करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी अवजड वाहनांच्या प्रवासाच्या वेळेत बदल केला आहे

Talegaon-Chakan Road: तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गावर अवजड वाहतुकीला 'या' वेळेत बंदी
पिंपरी : तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गावर सकाळी तीन तास आणि सायंकाळी तीन तास अवजड वाहतुकीस बंदी घालण्यात आली. सकाळी आणि सांयकाळी होणारी वाहतूक कोंडी आणि अपघातांची प्रकरणे लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेने हा बदल केला. पिंपरी - चिंचवड वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी याबाबतचे आदेश दिले.
चाकण-तळेगाव चौकातून तळेगाव-चाकण व चाकण-शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ डी हा मुंबई त्याचप्रमाणे रांजणगाव औद्योगिक क्षेत्रास जोडणारा राष्ट्रीय महामार्ग आहे. तो चाकण-तळेगाव चौकातून जातो. तसेच पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६० हा देखील याच चौकातून जातो. या चौकात हलकी, जड अवजड वाहनांची तसेच पादचाऱ्यांची देखील मोठी वर्दळ असते. या चौकात तसेच मार्गावर वारंवार वाहतूक कोंडी होत असून किरकोळ तसेच प्राणांतिक अपघात होऊन जिवीतहानी होत असते. चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी तसेच अपघातांना प्रतिबंध करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी अवजड वाहनांच्या प्रवासाच्या वेळेत बदल केला आहे.
शिक्रापूर बाजूकडून चाकण मार्गे तळेगाव बाजूकडे जाण्यास व तळेगाव बाजूकडून चाकण मार्गे शिक्रापूरकडे येण्यास हलकी / लहान वाहने वगळून सर्व जड/मध्यम वाहनांच्या वाहतुकीस सकाळी आठ ते ११ वाजे दरम्यान व सायंकाळी पाच ते रात्री आठ वाजेदरम्यान प्रवेश बंदी असणार आहे.
आढावा बैठकीनंतर उपाययोजना
पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी चाकण परिसरात पाहणी करून आढावा घेतला. तसेच वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी १८ उपाययोजना सूचविल्या. त्यात अवजड वाहनांना गर्दीच्या वेळेत प्रवेश बंदी करण्याबाबत सूचित केले होते. त्यानंतर पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. त्यामुळे तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.