पिंपरी-चिंचवड शहरातील चौकांमध्ये बंदी; भाजीमंडईत नागरिकांकडून मुक्त संचार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 02:56 PM2020-03-24T14:56:58+5:302020-03-24T15:06:24+5:30
खरेदीसाठी नागरिकांची गर्दी
पिंपरी : जनता संचारबंदीनंतर सोमवारी नागरिकांनी रस्त्यावर येत गर्दी केल्याने शासनाकडून संचारबंदी करण्यात आली. मात्र असे असतानाही मंगळवारी शहरवासीयांकडून किराणा दुकान व भाजीमंडईत गर्दी केली होती. शहरातील मुख्य चौकात संचारबंदी तर मंडईत गर्दी असे चित्र पिंपरी-चिंचवडमध्ये आहे.
कोरोनाग्रस्त १२ रुग्ण पिंपरी-चिंचवड शहरात आहेत. त्यामुळे महापालिकेडून उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच राज्य शासनाकडूनही संचारबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने व सेवा वगळून इतर सर्व व्यवसाय बंद ठेवण्यात आले आहेत. अत्यावश्यक म्हणून भाजीपाला, दूध विक्री व किराणा विक्री सुरूच राहील, असे शासनाकडून सातत्याने जाहीर करण्यात येत आहे. मात्र नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. देशभर रविवारी जनता संचारबंदी पाळण्यात आली. त्याला पिंपरी-चिंचवडकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मात्र सोमवारी नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले. त्यामुळे शासनाकडून संचारबंदी करण्यात आली. किराणा व भाजीपाला घराजवळील दुकानातून खरेदी करणे अपेक्षित असताना नागरिकांनी भाजीमंडईत तसेच पिपरी येथील मुख्य बाजारपेठेतील किराणाच्या ठोक विक्रीच्या दुकानांमध्ये रांगा लावून गर्दी केली. त्यामुळे नागरिकांनी संचारबंदी झुगारले असल्याचे दिसून आले.
शहरातील मुख्य चौकांमध्ये पोलीस बंदोबस्त आहे. त्यामुळे या चौकांमध्ये वाहने तुरळक आहेत. मात्र पिंपरी येथील लाल बहादूर शास्त्री भाजी मंडईत गर्दी झाल्याने येथील वाहनतळात मोठ्या संख्येने वाहने आली होती. नेहमीप्रमाणेच येथील पार्किंग ह्यफुल्लह्ण झाले होते. त्यामुळे भाजीमंडईबाहेर वाहनांचा खोळंबा झाला होता.