बांगलादेशी घुसखोराचे पिंपरीत वास्तव्य; शहरात खळबळ, घुसखोराला अटक
By नारायण बडगुजर | Published: February 10, 2024 04:33 PM2024-02-10T16:33:24+5:302024-02-10T16:34:18+5:30
आरोपीच्या मोबाइलमध्ये बाहेरील देशातील मोबाइल क्रंमाक मिळाले आहेत
पिंपरी : भारतात गैरमार्गाने प्रवेश करून बांगलादेशी घुसखोराने पिंपरीत वास्तव्य केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. घुसखोराला पोलिसांनी अटक केली. पिंपरीतील अण्णासाहेब मगर झोपडपट्टी येथे शुक्रवारी (दि. ९) सकाळी साडेदहाच्या सुमारास पिंपरी पोलिसांनी ही कारवाई केली.
मोहम्मद सकायत मुल्ला (४५, रा. मुक्कामपूर, बांगलादेश) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याला शनिवारी (दि. १०) न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद सकायत हा बांगलादेशी नागरिक आहे. भारतात येण्यासाठी तसेच वास्तव्य करण्यासाठी त्याने कोणतीही कायदेशीर परवानगी घेतली नाही. घुसखोरी करून देशात आला आणि पिंपरी येथील अण्णासाहेब मगर झोपडपट्टीमध्ये वास्तव्य केले. याबाबत माहिती मिळताच पिंपरी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
मोबाइल, आधारकार्ड जप्त
मोहम्मद सकायत याच्याकडे एक मोबाइल मिळून आला. अहमदाबाद (गुजरात) येथील पत्ता असलेले त्याचे आधारकार्ड मोबाइलमध्ये मिळून आले. त्याने ते आधारकार्ड कुठून मिळवले, त्यासाठी कोणत्या कागदपत्रांचा वापर केला, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
पालघरमध्येही गुन्हा दाखल
मोहम्मद सकायत याच्या विरोधात पालघर पोलिसांनी २०२० मध्ये गुन्हा दाखल केला आहे. भारतात घुसखोरी करून वास्तव्य केल्याप्रकरणीच तो गुन्हा असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, नेमके कशाप्रकरणी गुन्हा दाखल केला होता, याबाबत पिंपरी पोलिस माहिती घेत आहेत.
मोबाइलमध्ये मिळाले परदेशी क्रंमाक
मोहम्मद सकायत हा मजूर काम करत असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. मात्र, त्याच्या मोबाइलमध्ये काही परक्या देशातील मोबाइल क्रंमाक मिळून आले आहेत. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला आहे. हे क्रमांक नेकमे कुणाचे आहेत, तो कशासाठी बाहेरच्या देशातील क्रमांकांवर कोणाशी संपर्क साधत होता, याबाबत तपास सुरू आहे.