सावधान! दररोज होतेय २९ जणांचे बँक खाते रिकामे; सायबर भामट्यांकडून फसवणूक

By रोशन मोरे | Published: May 27, 2023 05:06 PM2023-05-27T17:06:47+5:302023-05-27T17:08:39+5:30

ऑनलाईन पैसे पाठवण्यापासून कामाच्या नव्या संधी शोधण्यासाठी इंटरनेटचा वापर केला जात आहे.

Bank accounts of 29 people are empty every day; Cheating by cyber crooks | सावधान! दररोज होतेय २९ जणांचे बँक खाते रिकामे; सायबर भामट्यांकडून फसवणूक

सावधान! दररोज होतेय २९ जणांचे बँक खाते रिकामे; सायबर भामट्यांकडून फसवणूक

googlenewsNext

पिंपरी : ऑनलाईन भामटे नवनवे मार्ग वापरून नागरिकांची ऑनलाईन पद्धतीने फसवणूक करून त्यांचे बँक खातेच रिकामे करत आहेत. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात २४ एप्रिल ते २४ मे या एका महिन्याच्या कालावधीत तब्बल ८७९ ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यातून सरासरी दिवसाला २९ ऑनलाईन फसवणूक होत असल्याचे दिसून येत आहे.
इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ऑनलाईन पैसे पाठवण्यापासून कामाच्या नव्या संधी शोधण्यासाठी इंटरनेटचा वापर केला जात आहे. या संधीचा फायदा घेत सायबर चोरटे लिंक पाठवून नागरिकांना मधाळ बोलण्यात गुंतवून तर कधी कारवाईची भीती दाखवून त्यांच्याकडून ओटीपी घेऊन त्यांचे बँक खाते रिकामे करत आहेत. प्रत्येकवेळी नवी पद्धत वापरून फसवणूक होत आहे.

ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार

सायबर चोरट्यांकडून नागरिकांना ऑनलाईन गंडा घालण्यासाठी विविध प्रकाराचा वापर केला जातो. त्यामध्ये प्रामुख्याने केवायसी अपडेटच्या बहाण्याने लिंक पाठवणे, ज्येष्ठांना मदत करण्यासाठी ॲप डाऊनलोड करण्यास सांगून त्यांच्या मोबाईलचा ताबा घेऊन ऑनलाईन पासवर्ड मिळवणे, गिफ्ट पाठवल्याचे असून ते कस्टममध्ये अडकल्याचे सांगून लाखो रुपये उकळणे, व्हिडीओला लाईक शेअर करण्यास सांगून ‘टास्क फ्राॅड’ करणे, मेट्रोमोनिअल साईटचा वापर करून खोट्या प्रोफाईलद्वारे प्रेमाचे नाटक करून पैसे उकळणे, सेक्सटोर्शनद्वारे बदनामीची धमकी देऊन पैसे घेणे आदी माध्यमातून नागरिकांची ऑनलाईन फसवणूक केली जाते.

लाईक, शेअरमुळे आयटीयन्सचे लाखोंचे नुकसान

सायबर शाखेकडे येणाऱ्या ऑनलाईन फसवणुकीमध्ये ‘टास्क फ्रॉड’चे प्रमाण अधिक आहे. कामाचे टास्क देऊन त्यातून गुंतवणुकीचे अथवा टास्क पूर्ण केल्यानंतर अधिक पैसे देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक करण्यात येत आहे. एका आयटीतील मॅनेजरने या टास्क फ्रॉडला भुलून तब्बल ५७ लाख रुपये गमावले तर, एका तरुणीने आपल्या बँक खात्यातील २४ लाख रुपये सायबर भामट्यांच्या बँक खात्यावर पाठवले. हिंजवडी पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्याने सांगितले की, सायबर भामट्यांना बळी पडणाऱ्यांमध्ये सर्वाधिक प्रमाण हे आयटीयन्सचे आहे. जर दिवसाला २९ ऑनलाईन फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले तर त्यात फसवल्या गेलेल्या आयटीयन्सचे प्रमाण हे ९० टक्के असते.

अधिक कमाईचा हव्यास

महिन्याला लाखो रुपये कमविणारे आयटीयन्स सायबर चोरट्यांचे शिकार ठरत आहेत. याविषयी आयटीत काम करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, त्यांनी सांगितले की, अधिक कमाईचा हव्यास हा आयटीयन्सच्या मुळावर उठत आहेत. एक-दोन तास काम करून जास्त पैसा मिळेल या आमिषापोटी ते सायबर चोरट्यांनी पाठविलेल्या लिंक ओपन करून त्यांच्या जाळ्यात अडकून लाखो रुपये गमावतात.

मनुष्यबळाची कमतरता

सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असताना सायबर सेलसाठी असणारे मनुष्यबळ मात्र अपुरे आहे. सायबर सेलचे स्वतंत्र पोलिस ठाणे होण्यासाठी सरकारकडे पोलिस आयुक्तालयाकडून प्रस्ताव पाठविला गेला आहे. त्याचा पाठपुरावा देखील केला जात आहे. मात्र, स्वतंत्र सायबर पोलिस ठाण्याला अजूनही मंजुरी मिळालेली नाही.

सायबर सेलमध्ये सध्या असलेले मनुष्यबळ

पीआय - एक
एपीआय - तीन
कर्मचारी - १८

सायबर सेलमध्ये आवश्यक मनुष्यबळ

अधिकारी - पाच
कर्मचारी - ७५

ऑनलाईन फसवणुकीच्या प्रकारात बँक खाते, संबंधित क्रमांक मिळून येतो. मात्र, टेलिग्रामसारखे माध्यम स्वायत्त असल्याने त्याद्वारे होणारी फसवणूक ही व्यक्तीकडून होते की ‘एआय’च्या माध्यमातून होते, हे शोधणे आव्हानात्मक असते. टेलिग्राम, व्हॉट्सॲप यांसारख्या माध्यमातून पैसे भरून नोकरी लागत नाही, याचे भान आयटीयन्सला असणे आवश्यक आहे.
- संजय तुंगार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर सेल

Web Title: Bank accounts of 29 people are empty every day; Cheating by cyber crooks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.