दारू न दिल्याने बार मॅनेजरसह कामगारांवर चाकूने हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 15:10 IST2025-01-15T15:06:23+5:302025-01-15T15:10:06+5:30

हल्लेखोरांचा पाठलाग करून पुण्यातून अटक ; माळेगाव पोलिसांची कामगिरी

Bar manager and workers attacked with knife for not serving alcohol | दारू न दिल्याने बार मॅनेजरसह कामगारांवर चाकूने हल्ला

दारू न दिल्याने बार मॅनेजरसह कामगारांवर चाकूने हल्ला

सांगवी (बारामती) : मध्यरात्री बारवर जाउन दारू न दिल्याचा राग मनात धरून बार मॅनेजरसह  कामगारांना धक्काबुक्की करत एकाच्या पोटात चाकू खुपसून इतर कामगारांवर चाकूने हल्ला करून फरार झालेल्या  हल्लेखोरांना पाठलाग करून  मंगळवारी पहाटे हडपसर गाडीतळ परिसरातून ताब्यात घेण्यात माळेगाव पोलिसांना मोठे यश आले आहे. चाकूने हल्ला केल्याबाबत हॉटेल मॅनेजर श्री ऋषिकेश भाऊसाहेब मिंड यांनी माळेगाव पोलीस ठाण्यात  विशाल बाबा मोरे, संदेश उर्फ आबा अनिल शिंदे दोघे (रा. कऱ्हावागज ता.बारामती ),निखिल अशोक खरात रा.आमराई बारामती ता.बारामती जि.पुणे यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे.

क-हावागज (ता. बारामती) या गावच्या हद्दीत असलेल्या हॉटेल शारदा एक्झिक्युटिव्ह बार, रेस्टॉरंट अँड लॉजींगवर  सोमवार (दि.१३ रोजी) रात्री दहा वाजता बंद करून मॅनेजर तसेच इतर सर्व कामगार काम आवरून अकरा वाजण्याच्या सुमारास झोपण्यासाठी गेले होते. दरम्यान मध्यरात्री पाऊणे दोन वाजण्याच्या सुमारास  विशाल बाबा मोरे, संदेश उर्फ आबा अनिल शिंदे,निखिल अशोक खरात यांनी हॉटेल मॅनेजर ऋषिकेश भाऊसाहेब मिंड (मूळ रा.कडा ता.आष्टी जि.बीड) सध्या रा.हॉटेल शारदा बार अँड लॉजिंग कऱ्हावागज ता.बारामती जि.पुणे) हे हॉटेल शारदा मध्ये झोपलेल्या रूममध्ये घुसून शिवीगाळ करीत मला दारू देत नाहीस का आमच्याच गावात हॉटेल चालवून आम्हालाच नडतो काय आता तुला सोडत नाही. आता आम्हाला नड असे बोलून मारहाण करून फिर्यादीस खाली पाडले. तसेच त्यानंतर हल्लेखोर निखिल खरात याने त्याच्या जवळील असलेले धारदार चाकूने फिर्यादीवरून हल्ला केला. यावेळी  फिर्यादी पटकन मागे सरकले असता तो वार फिर्यादीच्या पायावर लागला त्यामुळे हॉटेलमधील कामगार फिर्यादीस वाचविण्याकरिता आले होते. दरम्यान मध्यस्थी आलेल्या  दिनेश वर्मा मूळ रा.उत्तर प्रदेश याच्या पोटात हल्लेखोर निखिल खरात याने धारदार चाकू खुपसला तसेच इतर कामगारांवर देखील चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर आरोपी चार चाकी वाहनातून पळून गेले.

घटनेची माहिती माळेगाव पोलीसांना मिळाली असता गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून माळेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे यांनी गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक देवीदास साळवे यांना हल्लेखोरांचा तपास करण्याचे आदेश दिले. त्यानंतर तात्काळ पथक रवाना केले हल्लेखोर  विशाल बाबा मोरे, संदेश उर्फ आबा अनिल शिंदे, निखिल अशोक खरात हे फरार झाले होते.

माळेगाव पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे हल्लेखोरांना पाठलाग करून  मंगळवारी पहाटे हडपसर गाडीतळ परिसरातून ताब्यात घेतलेले आहे. सहायक पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे,पोलीस उपनिरीक्षक अमोल खटावकर,देविदास साळवे,पोलीस अंमलदार राहुल पांढरे,विजय वाघमोडे,ज्ञानेश्वर मोरे,नंदकुमार गव्हाणे,अमोल राऊत, सागर पवार,जयसिंग कचरे,अमोल कोकरे यांनी ही कामगिरी केली आहे.

Web Title: Bar manager and workers attacked with knife for not serving alcohol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.