भावी आमदारांचे गुडघ्याला बाशिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 06:53 AM2018-04-26T06:53:51+5:302018-04-26T06:53:51+5:30

विधानसभा निवडणूक : राजकीय पक्षाऐवजी वैैयक्तिक प्रचार करण्यावर भर

Bashing of knee to future legislators | भावी आमदारांचे गुडघ्याला बाशिंग

भावी आमदारांचे गुडघ्याला बाशिंग

Next

हणमंत पाटील ।
पिंपरी : आगामी लोकसभेबरोबर विधानसभा निवडणूक डिसेंबरमध्ये होण्याची चर्चा आहे. त्यामुळे पिंपरी, चिंचवड, मावळ व भोसरी मतदारसंघांतील इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. मतदारसंघातील विविध कार्यक्रमांत ‘भावी आमदार’ असा आवर्जुन उल्लेख करण्याचा आग्रह धरला जात आहे. तसेच शहरातील जाहिरातफलक, चारचाकी वाहने, रिक्षा यांच्यावर भावी आमदारांचा फोटो ठळक उल्लेखासह झळकत आहे.
शहरातील राजकारणात सुरुवातीपासून गावकी-भावकीचा प्रभाव आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत उद्योग-व्यवसाय व नोकरीच्या निमित्ताने स्थलांतरितांचे प्रमाण वाढले आहे. साधारण ५० ते ६० टक्के नागरिक बाहेरगावाहून येथे स्थायिक झाले आहेत. त्यामुळे निवडणुकीतील मतांचे समीकरण बदलू लागले आहे. गेल्या दशक-दोन दशकभरात अनेकांनी शहरात स्थायिक होऊन उद्योग-व्यवसायांत भरारी घेतली आहे. आर्थिक सुबत्ता आणि जनसंपर्क वाढल्याने शिक्षणसम्राट, उद्योजक व व्यावसायिकांची नावे इच्छुक म्हणून पुढे येऊ लागली आहेत.
विविध पक्षांच्या नगरसेवकांनाही विधानसभेवर निवडून जाण्याचे वेध लागले आहेत. काही पदाधिकाऱ्यांनी दोन वर्षांपासून महापालिकेतील लाभाची पदे घेऊन आमदारकीसाठी मोर्चेबांधणी सुरूही केली आहे. मतदारसंघातील घरोघरी जाऊन थेट मतदरांशी संवाद, नागरिकांच्या वैैयकितक अडचणींची सोडवणूक करणे, शाळा-कॉलेजच्या कार्यक्रमांना प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती, ज्येष्ठ नागरिक व महिला संघटनांच्या कार्यक्रमांना आर्थिक मदत, छोट्या-मोठ्या कार्यक्रमांना हजेरी लावल्यानंतर समर्थकांमार्फत संयोजकांकडे भावी आमदार असा आवर्जून उल्लेखाचा आग्रह धरला जात आहे.
विशेषत: वाढदिवसानिमित्ताने शहरातील मोक्याच्या ठिकाणी झळकणाºया होर्डिंग व जाहिरातफलकांवर स्वत:च्या फोटोमागे विधानभवनाच्या इमारतीचा फोटो दाखविण्याची तजवीज केली जात आहे. कार्यकर्त्यांच्या मोटारींवर भावी आमदार असा उल्लेख व फोटो दिसू लागले आहेत. विशेष म्हणजे स्वपक्षीय चिन्ह टाळून वैयक्तिक ब्रँडिंग करताना हे भावी आमदार दिसत आहेत. त्यावरून पक्षाने तिकीट दिले नाही, तरी वेगळ्या तºहेने लढण्याची तयारी असल्याचे कार्यकर्त्यांना ठामपणे सांगत आहेत. काही खासगी संस्थांमार्फत मतदारांचा कल कोणत्या पक्षाला आहे, याचीही चाचपणी इच्छुक करीत आहेत.

यात्रा अन् लग्नाला हजेरी
सध्या शहर आणि मावळ परिसरातील विविध गावांच्या यात्रा सुरू आहेत. त्या ठिकाणी भावी आमदारांच्या स्वागताचे फलक झळकत आहेत. यात्रेतील कुस्ती, तमाशा व सांस्कृतिक कार्यक्रमांना या इच्छुकांकडून बक्षिसे जाहीर केली जात आहेत. शिवाय लग्नसराईची संधी साधून कार्यकर्त्यांच्या लवाजम्यासह लग्नाला आवर्जून हजेरी लावत आहेत.

Web Title: Bashing of knee to future legislators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.