भोसरीत लांडे-लांडगेंमध्ये वर्चस्वाची लढाई
By admin | Published: April 5, 2016 12:49 AM2016-04-05T00:49:01+5:302016-04-05T00:49:01+5:30
गावकी आणि भावकीच्या राजकारणाचा अनुभव भोसरीकरांना नवा नाही. ‘दहा गावे दुसरी, तर एक गाव भोसरी’ असे म्हटले जाते.
भोसरी : गावकी आणि भावकीच्या राजकारणाचा अनुभव भोसरीकरांना नवा नाही. ‘दहा गावे दुसरी, तर एक गाव भोसरी’ असे म्हटले जाते. याच गावात विद्यमान आमदार महेश लांडगे आणि माजी आमदार विलास लांडे यांच्यात वर्चस्वाची आणि श्रेयवादाची लढाई सुरू आहे. त्यामध्ये कार्यकर्ते व समर्थकांची ससेहोलपट होत आहे.
भोजापूर म्हणून ऐतिहासिक संदर्भ असणाऱ्या भोसरीत गावकी-भावकीच्या राजकारणाचा प्रभाव आहे. येथील राजकारण नेहमी स्थानिकांभोवतीच फिरत राहिले आहे. राजकीय संधी मिळताच शह आणि काटशह देण्याची संधी येथील नेते सोडत नाहीत, हा आजवरचा इतिहास आहे. गेल्या दहा वर्षांत या गावात मामा आणि भाचेजावयामधील राजकीय चढाओढ शहरवासीयांसाठी कुतूहलाचा विषय राहिलेली आहे. माजी आमदार विलास लांडे यांच्या तालमीत तयार झालेल्या विद्यमान आमदार महेश लांडगे यांनी आपले राजकीय वर्चस्व निर्माण केले आहे. वरकरणी मामा-भाचे भांडत नसले, तरी त्यांच्या समर्थकांत मात्र नेहमीच धुसफूस सुरू असते. (वार्ताहर)पहले आप धोरण
आमदार महेश लांडगे हे मूळचे राष्ट्रवादीचे आहेत. मात्र, विधानसभेत त्यांना राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली होती. विजयीही झाले. निवडणुकीनंतर त्यांनी राष्ट्रवादीशी असणारा घरोबा तोडलेला नाही. दुसरीकडे जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही जवळीक कायम ठेवली आहे. ते नक्की राष्ट्रवादीचे, की भाजपाचे हे चित्र अजूनही स्पष्ट झालेले नाही. दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीतीलच स्थानिक नेत्यांनी विरोध केल्याने लांडे यांचा पराभव झाला. राष्ट्रवादीतील स्थानिक नेतृत्वाकडून न्याय मिळत नसल्याने लांडगेसमर्थक तीव्र नाराज आहेत. पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाची वाट पाहत आहेत. तेही पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. दोन्ही नेते ठोस निर्णय घेत नसल्याने या दोघांच्या कार्यकर्त्यांची गोची झाली आहे. राष्ट्रवादीतील नाराजी दूर करण्याचे आव्हान
सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गटबाजीला उधाण आले आहे. सत्तारूढ पक्षनेत्या आणि महापौर बदलाची मागणी करून माजी आमदार विलास लांडे यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. ‘न्याय न दिल्यास वेगळा मार्ग स्वीकारू’ असा इशाराच लांडे गटाने दिला आहे. पक्षनेत्या आणि पक्षातील अन्य स्थानिक नेत्यांच्या मनमानीविरोधात थेट पक्षश्रेष्ठींकडे दाद मागितली आहे. त्यामुळे नाराजी दूर करण्याचे मोठे आव्हान राष्ट्रवादीसमोर आहे.
भाजपाकडून गळ
भोसरी विधानसभेतील लांडे किंवा लांडगे असे दोन्हीही मोहरे भाजपाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. दोन्हींपैकी एकास आपल्या पक्षात खेचण्यासाठी भाजपाचे नेते उत्सुक आहेत. मात्र, लांडगे आणि लांडे हे दोन्हीपैकी एकानेही अजूनही ठोस निर्णय घेतलेला नाही. दोघेही एकमेकांच्या निर्णयाची वाट पाहत आहेत. त्यामुळे भाजपाच्या गळाला कोण लागणार, ही केवळ चर्चा ठरली.