नागरिक हो, अॅपद्वारे ऑनलाइन पेमेंट रिक्वेस्ट स्वीकारताना रहा सावध !
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2019 02:21 PM2019-08-11T14:21:18+5:302019-08-11T14:23:02+5:30
अॅपद्वारे पेमेंट स्वीकारा असे सांगून ऑनलाईन गंडा घातला जात असल्याची अनेक प्रकरणे पिंपरी- चिंचवड शहरात उघडकीस आली आहेत.
नारायण बडगुजर
पिंपरी : अॅपद्वारे ऑनलाइन आर्थिक व्यवहार करणाऱ्या नागरिकांनो, सावधान ! तुमच्या बँक खात्याशी ‘कनेक्ट’ असलेल्या मोबाइल क्रमांकावर पेमेंटसाठीची रिक्वेस्ट पाठवितो. ती स्वीकारा असे सांगण्यात येते. त्यानंतर तुमच्या खात्यात पैसे जमा होतील, असं सांगितले जाते. मात्र ‘रिक्वेस्ट’ स्वीकारणाऱ्या व्यक्तीच्या बँक खात्यातून रक्कम गायब होते. खात्यात पैसे जमा होण्याऐवजी कपात होत असल्याचे निदर्शनास आले आहे. ऑनलाइन व्यवहारांच्या ‘अॅप्स’बाबत पूर्ण माहिती नसलेल्या बहुतांश मोबाइलधारकांना अशा पद्धतीने हजारो रुपयांचा गंडा घालण्यात येत आहे.
आपल्याकडील वाहन तसेच इतर वस्तू विक्री करताना त्याला चांगली किंमत मिळावी, अशी माफक अपेक्षा विक्रेत्याची असते. त्यासाठी ऑनलाइन विक्रीच्या पर्यायाला पसंती देण्यात येते. विक्री करावयाचे वाहन किंवा वस्तूचे काही फोटो संबंधित वेबसाइटवर अपलोड केले जातात. त्यानंतर काही खरेदीदारांकडून या वस्तूबाबत चौकशी केली जाते. यातील काही खरेदीदार वैयक्तिक संपर्क साधून खरेदी करावयाची वस्तू किंवा वाहन पसंत असून, किंमत योग्य सांगा, असे सांगतात. संबंधित वस्तू खरेदी करायचीच आहे, तुम्ही ती इतर कुणालाही देऊ नका, त्याचे पैसे मी ऑनलाइन पाठवितो, असे सांगण्यात येते. त्यामुळे आपल्या विक्री करावयाच्या वाहन किंवा वस्तूला चांगली किंमत मिळाली आहे, असा संबंधित विक्रेत्याचा समज होतो.
वाहन किंवा वस्तू घ्यायला लगेचच येऊ शकणार नाही. एक-दोन दिवसांत डिलिव्हरी घ्यायला येतो. मात्र त्याचे पेमेंट तुम्हाला ऑनलाइन आताच पाठवायचे आहे. तुमच्या बँक खात्याशी कनेक्ट असलेला मोबाइल क्रमांक सांगा. त्यावर पेमेंटसाठीची रिक्वेस्ट पाठवितो, ती रिक्वेस्ट स्वीकारा. त्यामुळे संबंधित क्रमांक तुमचाच असून, त्यावर व्यवहार होऊ शकतो, याची खात्री होऊन त्यानंतर तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतील, असे खरेदीदाराकडून सांगण्यात येते. त्यामुळे संबंधित विक्रेता रिक्वेस्ट स्वीकारतो. त्यानंतर त्याच्या बँक खात्यातून रक्कम कपात होते. मात्र पैसे जमा झाल्याचा माझ्या क्रमांकावर मॅसेज आला नाही, असे संबंधिताकडून सांगण्यात येते. पुन्हा रिक्वेस्ट पाठविली जाते. पुन्हा पैसे कपात होतात. मात्र पैसे आले नाहीत, असे पुन्हा सांगण्यात येते.
‘आर्मी’त असल्याचा व्हॉट्सअॅपवर डीपी
संबंधित फसवणूक करणारी व्यक्ती ‘आर्मी’त नोकरीस असल्याचे सांगते. ‘आर्मी’चा लोगो किंवा सैन्य दलाशी संबंधित छायाचित्र त्याच्या व्हॉटस्अॅप ‘डीपी’वर ठेवलेला असतो. मी आता दिल्लीत आहे. ‘आर्मी’त असल्यामुळे मला सुटी मिळत नाही. आमच्या घरच्यांना डिलिव्हरी घ्यायला पाठवून देतो, ते पुण्यातच राहतात. तसेच ऑफिसला असल्यामुळे मला मोबाइल बंद ठेवावा लागतो. ऑफिसला जाण्याआधीच आपला संपर्क होऊ शकतो. त्यासाठी आता लगेचच तुमच्या मोबाइल क्रमांकावर पेमेंट पाठवून देतो, पेमेंटसाठीची रिक्वेस्ट तुम्ही स्वीकारा, असे सांगून गंडा घातला जातो.
पिंपरी-चिंचवडमध्ये दररोज होतेय चार जणांची फसवणूक
ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच आहेत. जानेवारी ते जुलै २०१९ या सात महिन्यांत पिंपरी-चिंचवडमधील ऑनलाइन फसवणूक झालेल्या ८५१ नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज दिले आहेत. यात पेमेंटसाठी रिक्वेस्ट पाठवून फसवणूक केल्याचे सुमारे १२ प्रकार आतापर्यंत समोर आले आहेत. ऑनलाइन फसवणूक झालेल्यांच्या आकडेवारीनुसार शहरात दररोज सरासरी चार नागरिकांची ऑनलाइन फसवणूक होत असल्याचे दिसून येते. फसवणूक झालेले बहुतांश नागरिक विविध कारणांमुळे तक्रार करण्यास पुढे येत नाहीत.
ऑनलाइन पेमेंट आपल्या बँकेच्या खात्यात जमा होण्यासाठी कोणत्याही प्रकारची रिक्वेस्ट स्वीकारण्याची गरज नसते. असे सांगणारा व्यक्ती आपली फसवणूक करणार असल्याचे आपण लक्षात घेतले पाहिजे. त्यासाठी असा व्यवहार करताना सतर्क राहिले पाहिजे.
- डॉ. विवेक मुगळीकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर सेल, पिंपरी-चिंचवड