आजारांपासून काळजी घ्या; रुग्णसंख्या वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 02:23 AM2018-09-18T02:23:35+5:302018-09-18T02:24:01+5:30

शहरामध्ये साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. स्वाइन फ्लू, डेंगी या आजाराच्या रुग्ण संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.

Be Careful With Illnesses; The number of patients increased | आजारांपासून काळजी घ्या; रुग्णसंख्या वाढली

आजारांपासून काळजी घ्या; रुग्णसंख्या वाढली

Next

पिंपरी : शहरामध्ये साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. स्वाइन फ्लू, डेंगी या आजाराच्या रुग्ण संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. महापालिकेच्या व खासगी रुग्णालयामध्ये रुग्णांची तुडुंब गर्दी पाहयला मिळत आहे. साथीच्या आजारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. या जीवघेण्या साथीच्या आजारांमध्ये मलेरियाचा ही समावेश होत असल्याने त्यापासून वाचण्यासाठी काळजी घेण्याचे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत २० रुग्णांना मलेरियाची लागण झाली आहे. जुलै महिन्यामध्ये सर्वाधिक ८ रुग्णांना मलेरियाची लागण झाली होती. प्लाझमोडियम या डासांच्या चावण्यामुळे हा आजार होतो. या आजाराची लागण झाल्यानंतर रुग्णाला थंडी वाजते. थंडीचा कालावधी पंधरा मिनिटे ते तासभर असतो. दुपारनंतर ताप येतो व घाम येऊन तो कमी होतो. त्याबरोबरच डोकेदुखी, अंगदुखी, कंबरदुखी अशी लक्षणे जाणवतात.
मलेरिया या आजाराची नुकतीच लागण झाली असेल तर ही लक्षणे सौम्य असतात. त्यामध्ये सुरुवातीस फक्त अंगावर काटा येणे, डोके दुखत राहणे, थकवा जाणवणे एवढीच लक्षणे असतात. रक्तनमुना तपासल्याशिवाय मलेरिया या आजाराची लागण झाली आहे की नाही याचा निर्णय घेणे अवघड असते. त्यामुळे लक्षणे वाटल्यास रक्त चाचणी करून घेणे आवश्यक आहे.
मलेरियाच्या तापामुळे काही वेळा मेंदूला सूज येऊन झटके येण्याची शक्यता असते. ही शक्यता बालकांमध्ये जास्त प्रमाणात आढळते. प्लाझमोडियम फाल्सिपॅरम प्रकाराच्या जंतूंमुळे रुग्ण कोमात जाण्याची व दगवण्याची शक्यता असते. काही रुग्णांत मूत्रपिंड निकामी होऊन लघवीत फुटलेल्या लाल रक्तपेशी दिसून येतात. या गंभीर आजारामुळे रुग्ण दगावण्याची शक्यता असते. अशा वेळी रुग्णांला त्वरित वैद्यकीय उपचार मिळणे गरजेचे असते.
शहर परिसरामध्ये साथीच्या आजारांमध्ये वाढ झाली आहे. स्वाइन फ्लूसारख्या आजाराने डोके वर काढले आहे. स्वाइन फ्लू व डेंगी यांचे रुग्ण सध्या मोठ्या प्रमाणावर आढळत असल्याने व त्याची लागण गर्भवती स्त्रिया व लहान मुले, तसेच वयोवृद्ध व हृदयरोग असणाऱ्या लोकांना जीवघेणी ठरत असल्याने त्यांना योग्य उपचार, तसेच टॅमी फ्लूच्या गोळ्या या वेळेत चालू होणे महत्त्वाचे आहे. या विषयी तसेच टॅमी फ्लूचे औषधोपचार सुरू करण्यासाठी शासनाने दिलेल्या सूचनांप्रमाणे जनजागृती सुरू आहे. ठिकठिकाणी ध्वनीक्षेपकाद्वारे माहिती दिली जात आहे. तसेच काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

या आजारावर महापालिकेच्या व खासगी रुग्णालयांमध्येही उपचार उपलब्ध आहेत़ मात्र याकडे दुर्लक्ष केले तर हा आजार प्राणघातक ठरू शकतो. या आजाराच्या तीव्रतेनुसार रुग्णांवर उपचार केला जातो. थंडीताप आल्यानंतर लगेचच डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावेत. ताप जास्त दिवस अंगावर काढू नये. या आजाराचा प्रसार थांबविण्यासाठी डासांना आळा घालणे महत्त्वाचे आहे.
आपल्या परिसरामध्ये डासांची उत्पत्ती होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. त्याचप्रणाणे सोसायटी व घराजवळील पाण्याच्या टाक्यांमध्ये गप्पी मासे सोडले पाहिजे. जेणेकरून हिवताप पसरवणाºया डासांची उत्पत्ती होणार नाही. परिसरामध्ये स्वच्छता ठेवणे. झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा. अंगभर कपडे घालावे. रुग्णांमध्ये मलेरिया या आजाराची लक्षणे वाटल्यास डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी, व डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घ्यावेत, असे आवाहन महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून करण्यात आले आहे.

Web Title: Be Careful With Illnesses; The number of patients increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.