सावधान! नोकरी मिळ्वण्यासाठी पैसे देताय; मग थांबा.., पिंपरीत एकाची ४ लाखांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 04:38 PM2022-03-30T16:38:29+5:302022-03-30T16:38:44+5:30
टाटा मोटर्स कंपनीच्या नावाचे जाॅईनिंग लेटर हे खोटे दस्तावेज बनवून त्यांच्या व्हाॅटसअप नंबरवर पाठवून आरोपीने फसवणूक केली.
पिंपरी : नोकरी लावण्यासाठी तीन लाख ९५ हजार रुपये घेतले. त्यानंतर टाटा मोटर्स कंपनीच्या नावाचे बनावट जाॅईनिंग लेटर दिले. सीएमई गेट, दापोडी येथे १७ डिसेंबर २०२१ ते २९ मार्च २०२२ या कालावधीत ही घटना घडली.
विजय काशिनाथ तांबे (वय ३८, रा. वाघोली, पुणे) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फारुख अहमदअली लासकर (वय ४०, रा. हरगुडे वस्ती, चिखली) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने सीएमई गेट, दापोडी आणि टाटा मोटर्स कंपनी, पिंपरी या ठिकाणी फिर्यादीला बोलावून घेतले. फिर्यादीचा विश्वास संपादन केला. नोकरी लावून देण्यासाठी फिर्यादीकडून वेळोवेळी रोख तसेच ऑनलाईन स्वरुपात एकूण तीन लाख ९५ हजार रुपये घेतले. फिर्यादी व त्यांच्या ओळखीचे सुनील लक्ष्मण बगाडे यांच्या मुलींना कामाला लावतो, असे आरोपीने सांगितले. तसेच टाटा मोटर्स कंपनीच्या नावाचे जाॅईनिंग लेटर हे खोटे दस्तावेज बनवून त्यांच्या व्हाॅटसअप नंबरवर पाठवून आरोपीने फसवणूक केली.