आळंदी नगरपरिषद स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 18:59 IST2025-01-09T18:50:23+5:302025-01-09T18:59:17+5:30
भारतीय जनता पार्टी खेड तालुका पदाधिकाऱ्यांची सदस्य नोंदणीबाबत बैठक घेण्यात आली

आळंदी नगरपरिषद स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा
आळंदी : आगामी आळंदी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा, असे आवाहन नगरपरिषदेसाठी इच्छुक उमेदवार, माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना भाजपच्या नेत्यांनी दिला आहे. प्रत्येक बूथवरून जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करण्याचे आवाहन भाजप पदाधिकाऱ्यांना करण्यात आले आहे.
आळंदी येथे नुकतीच जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी खेड तालुका पदाधिकाऱ्यांची सदस्य नोंदणीबाबत बैठक घेण्यात आली. यामध्ये आळंदीतील पदाधिकाऱ्यांचा ‘एकला चलो रे’चा सूर व्यक्त केला. वरिष्ठ पातळीवरदेखील अशाच हालचाली सुरू असून, शहरातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी गाफील न राहता स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी, असा कानमंत्र या बैठकीत देण्यात आला आहे.
यावेळी भाजप अनुसूचित जाती आघाडी प्रदेश उपाध्यक्ष अशोक उमरगेकर, जिल्हा संघटन सरचिटणीस संजय रौंधळ, जिल्हा उपाध्यक्ष कालिदास वाडेकर, विष्णुदास थिटे, तालुकाध्यक्ष शांताराम भोसले, संदीप सोमवंशी, महिला तालुकाध्यक्ष कल्पना गवारी, माजी पंचायत समिती सदस्य अमृत शेवकरी, भगवान मेदनकर, अभय काळे, संदेश जाधव, आळंदी भाजप शहराध्यक्ष किरण येळवंडे, माजी भाजप गटनेते पांडुरंग वहिले, माजी उपनगराध्यक्ष सचिन गिलबिले, युवा मोर्चा शहराध्यक्ष वासुदेव तुर्की आदींसह अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, आळंदी पालिकेत भाजपची सत्ता होती. आगामी सार्वत्रिक निवडणुकीतदेखील ही सत्ता कायम ठेवण्याचे मोठे आव्हान सर्व पदाधिकाऱ्यांवर असणार आहे. त्यादृष्टीने जोमाने कामाला लागण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.