गावी जाताय, चोरट्यांपासून सावधान! पोलिसांतर्फे सतर्कतेचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2018 01:51 AM2018-11-08T01:51:57+5:302018-11-08T01:52:17+5:30
दिवाळीच्या सुटीत घर बंद ठेवून अनेकजण आपापल्या मूळ गावी जातात. परंतु गावी जात असताना चोरी होणार नाही, याची योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
पिंपरी : दिवाळीच्या सुटीत घर बंद ठेवून अनेकजण आपापल्या मूळ गावी जातात. परंतु गावी जात असताना चोरी होणार नाही, याची योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
सुटीच्या काळात अनेक दिवस घर बंद ठेवून गावी जात असताना, शेजाऱ्यांना याबाबत कल्पना द्यावी. अधिक कालावधीसाठी गावी जायचे असेल, तर रोख रक्कम, तसेच मौल्यवान वस्तू, दागिने घरात ठेवून जाऊ नये. तीन ते चार दिवसांपेक्षा अधिक दिवस सलग घर बंद असेल, तर चोरटे अशा घरांवर पाळत ठेवतात. बंद घर असलेल्या परिसरातील आणखी काही लोक त्याच कालावधीत गावी गेले असतील, तर चोरट्यांना चोरी करण्यासाठी मोठी संधी उपलब्ध होत असते. सोसायटीतील एखाद-दुसरे कुटुंब काही दिवसांसाठी बाहेरगावी गेले असेल, तर बंद घर असल्याचे सहज लक्षात येत नाही. परंतु एकाच वेळी सोसायटीतील अनेक सदनिका बंद असतील, तर त्या ठिकाणी चोरी होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे शेजाºयांना कल्पना देऊन, तसेच आपण ज्या ठिकाणी जात आहे, त्या ठिकाणाची माहिती सोसायटीच्या व्यवस्थापकास द्यावी. अनोळखी रखवालदारावर विश्वास ठेवू नये. त्यांना कोणतीही वैयक्तिक माहिती देऊ नये. ही दक्षता घेतल्यास बंद सदनिकांतील चोरीच्या घटना टाळता येतील.
सोशल मीडियावर फोटो
व्हायरल करण्याचे टाळावे
मूळ गावी अथवा पर्यटनाला गेल्यास लगेच प्रत्येक क्षणी आपले फोटो व्हॉट्स अॅप, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम अशा समाजमाध्यमांवर अपलोड करण्याचे टाळावे, असेही पोलिसांनी सूचित केले आहे. पर्यटन स्थळी अथवा गावी गेले असल्यास कुटुंबासह तेथील छायाचित्र समाजमाध्यमांवर प्रसारित केल्यास चोरट्यांना त्याची माहिती मिळते.