मोठ्या आवाजातील होम थिएटरवरून एकमेकांना मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 12:33 AM2019-02-19T00:33:16+5:302019-02-19T00:35:17+5:30
माणची घटना : दोन्ही गटांची परस्परविरोधी तक्रार
पिंपरी : माण येथे दोन गटांत झालेल्या मारहाणप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही घटना येथील टीसीजी कंपनीजवळील लेबर कॅम्प येथे रविवारी दुपारी एकच्या सुमारास घडली.
मुकिंदा गोविंद पवार (वय ३८, रा. टीसीजी कंपनी साईट, फेज ३, माण) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार नुर आलम अली खान (वय २१), राहुल शेषराम चव्हाण (वय २४) अशी गुन्हा दाखल केलेल्यांचे नावे आहेत. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आरोपींनी त्यांच्या घरात मोठ्या आवाजात होम थिएटर लावला होता. त्या वेळी मुकिंदा पवार यांचा मित्र अनिल वाव्हळे हे नुर याच्याकडे गेले व त्यास आवाज कमी करण्यास सांगितले. त्या वेळी नुर याने वाव्हळे यांच्या पायावर रॉड मारला. तसेच फिर्यादी पवार यांच्या डोक्यात चव्हाण याने रॉड मारला. यासह इतर दोघांनी फिर्यादीच्या दोन मित्रांना सळईने डोक्यात मारहाण केली. तसेच शिवीगाळ केली. तसेच नुर आलम मोहम्मद अली (वय २१) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मुकिंदा गोविंद पवार, अनिल गौतम वाव्हळे (वय २१) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आरोपींनी यातील फिर्यादी नुर व त्यांचा मित्र राहुल शेषराव चव्हाण यांना लोखंडी रॉडने मारहाण केली व त्यांचा मित्र महम्मद इरफान रफिक खान, मुस्तफा महम्मद अली (वय २२) यांना इतर दोघांनी सळइने डोक्यात मारहाण केली. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.