किरकोळ कारणावरून दोन कुटुंबात हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 08:01 PM2019-11-14T20:01:37+5:302019-11-14T20:02:47+5:30
परस्पर विरोधात गुन्हा दाखल
पिंपरी : पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून किरकोळ कारणावरून दोन कुटुंबांमध्ये हाणामारी झाली. एका कुटुंबाने बांधकामावर मारलेले पाणी आपल्या घरासमोर पडले म्हणून तर दुसऱ्या कुटुंबाने घराला चिटकून भिंत बांधल्याच्या कारणावरून भांडण काढले असल्याचे परस्पर विरोधात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. ही घटना मंगळवारी (दि. १२) सकाळी पावणेबाराच्या सुमारास दापोडी येथे घडली.
लक्ष्मण आप्पाराव कांबळे (वय ५०, रा. रौंधळे चाळ, दापोडी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमर रामदास उदमले (वय ३४), रामदास बन्सी उदमले (वय ५८, दोघे रा. रौंधळे चाळ, दापोडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लक्ष्मण कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी उदमले आणि फिर्यादी लक्ष्मण यांच्यामध्ये जमिनीच्या कारणावरून मागील काही दिवसांपासून वाद सुरू होते. मंगळवारी सकाळी पावणेबाराच्या सुमारास लक्ष्मण त्यांच्या बांधकामावर पाणी मारत होते. ते पाणी उदमले यांच्या घरासमोर पडले. या कारणावरून उदमले पितापुत्रांनी मिळून लक्ष्मण यांना शिवीगाळ करत लोखंडी रॉडने मारहाण केली. यामध्ये त्यांच्या डोक्यास व पायास गंभीर दुखापत झाली आहे.
याच्या परस्परविरोधात रामदास बन्सी उदमले (वय ५८) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, बाळू उर्फ लक्ष्मण कांबळे, हृषीकेश लक्ष्मण कांबळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामदास यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रामदास यांच्या घराच्या बाजूला चिटकून भिंत बांधण्याच्या कारणावरून आरोपींनी भांडण काढले. रामदास यांना शिवीगाळ करत विटा फेकून मारल्या. यामध्ये रामदास जखमी झाले. तसेच त्यांच्या घरातील साहित्याचे नुकसान झाले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.