वाकड येथे दुचाकी अडवून तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2018 13:35 IST2018-08-28T13:34:52+5:302018-08-28T13:35:51+5:30
काही कारणावरून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून बदला घेण्यासाठी राजू यांच्यावर हा हल्ला करण्यात आला.

वाकड येथे दुचाकी अडवून तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार
पिंपरी-चिंचवड : जुन्या भांडणाचा बदला घेण्यासाठी मित्रानेच आपल्या साथीदारांसह बुलेट वरून जाणाऱ्या मित्राला रस्त्यात अडवून त्याच्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला चढवित त्याची बुलेट दुचाकीचे नुकसान करत हल्लेखोर फरार झाल्याची घटना सोमवारी (दि. २७) रात्री अकराच्या सुमारास वाकड रस्त्यावरील यमुना नगर येथे ही घटना घडली. राजू रफीक मुलाणी (वय २४, रा यमुना नगर वाकड रोड वाकड) असे या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार सोन्या शेख व त्याच्या अन्य तीन साथीदारांविरोधात (नावे समजू शकले नाहीत) वाकड पोलिसांनीगुन्हा दाखल केला आहे.
याबाबत वाकड पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, राजू व सोन्या हे एकमेकांचे मित्र असून पाठीमागे यांचे काही कारणावरून भांडणे झाली होती. त्या भांडणाचा राग मनात धरून बदला घेण्यासाठी राजू यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. राजू हे त्यांच्याकडील बुलेट ह्या दुचाकीवरून वाकडच्या दिशेने जात असताना दबा धरून बसलेल्या सोन्या व त्याच्या साथीदारांनी राजू यांची दुचाकी अडवून त्यांच्या डोक्यात कोयत्याने वार केले आणि त्यांची दुचाकीचे नुकसान करून अंधाराचा फायदा घेत ते पसार झाले. वाकड पोलीस पुढील तपास करत आहेत.