पोलिसांकडे तक्रार केल्याने पत्नीसह मुलाला मारहाण; पतीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2022 08:40 PM2022-05-28T20:40:30+5:302022-05-28T20:45:02+5:30
सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली....
पिंपरी : पोलिसांकडे तक्रार केल्याच्या कारणावरून पत्नी आणि मुलाला मारहाण केली. याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी पतीला अटक केली. केशवनगर, नेवाळेवस्ती, चिखली येथे शुक्रवारी (दि. २७) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली.
शंकर चिमणराव नेवाळे (वय ३७, रा. केशवनगर, नेवाळे वस्ती, चिखली) असे अटक केेलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकर नेवाळे आणि फिर्यादी महिला हे पती-पत्नी आहेत. आरोपी हा वेळोवेळी फिर्यादी महिलेला मानसिक व शारीरिक त्रास देत असल्याने महिलेने त्याच्या विरोधात चिखली पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. सध्या फिर्यादी महिला व तिचा पती हे एकमेकांच्या शेजारी राहत आहेत.
फिर्यादी महिलेला तिच्या नातेवाईकांच्या लग्नाला जायचे असल्याने त्यांनी त्यांच्या मुलाला चारचाकी वाहन आणण्यासाठी सांगितले. मुलाने चारचाकी गाडी का घेतली तसेच फिर्यादी महिलेने यापूर्वी दाखल केलेल्या गुन्ह्याच्या राग मनात धरून आरोपीने मुलाला मारहाण करून शिवीगाळ केली. तेसच फिर्यादी महिलेच्या राहत्या घराच्या हाॅलच्या व मुलाच्या बेडरुमच्या काचा व जाळी तोडून तुळशी वृंदावन उचकटले. आरोपीने दगड फेकून मारल्यामुळे फिर्यादीच्या डोक्याला दुखापत झाली. यात त्यांचा जीव जाईल हे माहीत असतानाही जाणीवपूर्वक आरोपीने दगड फेकून मारला, असे फिर्यादीत नमूद आहे.