भांडणात मध्यस्थी करणाऱ्या एसआरपीएफ जवानाला मारहाण; खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघांना ठोकल्या बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 12:54 PM2021-05-06T12:54:39+5:302021-05-06T12:55:12+5:30
नागरिकात निर्माण केले दहशतीचे वातावरण
पिंपरी: जीवे मारण्याच्या उद्देशाने एसआरपीएफ जवानाला मारहाण केली. तसेच दहशतीचे वातावरण निर्माण केले. याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. एचए मैदानालगत, नेहरुनगर, पिंपरी येथे मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली.
अजिंक्य रामदास नेटके (वय २४, रा. नेहरू नगर, पिंपरी), फिरोज करीम मुजावर (वय २६, रा. अक्षय सोसायटी), गाॅडफ्रे सायमन डिसुजा (वय २५, रा. खराळवाडी, पिंपरी), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांना न्यायालयात हजर केले असता ९ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. श्रीकांत रावसाहेब बेरड (वय २८, रा. मासुळकर कॉलनी, पिंपरी) यांनी या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीस निरीक्षक (गुन्हे) बडेसाब नाईकवडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बेरड हे राज्य राखीव पोलीस दलात (एसआरपीएफ) नोकरीला आहेत. ते मंगळवारी ड्यूटी संपवून मासुळकर कॉलनी येथे घरी जात होते. त्यावेळी नेहरूनगर येथे याच्या मैदाना लगत काही मुले मारामारी करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी गाडी थांबवून त्यांना हटकले. त्यानंतर आरोपींनी शिवीगाळ करून फिर्यादीला गाडीवरून खाली ओढले. जीवे मारण्याच्या उद्देशाने दगड मारून बेरड यांना जखमी केले. तुला आता जिवंत सोडत नाही, असे म्हणून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून आरोपींनी दहशतीचे वातावरण निर्माण केले.