मुला-मुलीचा संसार पाहण्यापूर्वीच काळाचा घाला; व्याही असलेल्या दोघांना भरधाव ट्रकने चिरडले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2023 03:35 PM2023-09-22T15:35:11+5:302023-09-22T15:37:25+5:30
पुणे-मुंबई महामार्गावर चिंचवड येथे बिग बाजार समोर बुधवारी (दि. २०) रात्री साडेदहाच्या सुमारास हा अपघात झाला...
- नारायण बडगुजर
पिंपरी : मुला-मुलीचा संसार सुरू होण्यापूर्वीच त्यांच्या वडिलांवर काळाने घाला घातला. व्याही असलेल्या दोघांना भरधाव ट्रकने चिरडले. पुणे-मुंबई महामार्गावर चिंचवड येथे बिग बाजार समोर बुधवारी (दि. २०) रात्री साडेदहाच्या सुमारास हा अपघात झाला.
छत्राराम रामजी चौधरी (४५, रा. रावेत), आछलाराम दर्गाजी चौधरी (५०, रा. चिंचवडगाव) अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. ट्रक चालक रामेश्वर तुळशीराम जाधव (२३, रा. शिंदेगाव, ता. सिन्नर, जि. नाशिक, मूळगाव कारली, जि. वाशिम) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिस कर्मचारी संदीप शेळके यांनी याप्रकरणी गुरुवारी (दि. २१) पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आछलाराम हे एलआयसी एजंट होते. छत्राराम हे सौंदर्य प्रसाधनांचे ठोक विक्रेते होते. दोघेही एका दुचाकीवरून पुणे येथून चिंचवड येथे जात होते. त्यावेळी चालक रामेश्वर जाधव याच्या ताब्यातील ट्रकने आछलाराम आणि छत्राराम यांच्या दुचाकीला धडक दिली. यात दोघेही दुचाकीवरून खाली पडले. त्यानंतर ट्रकचे चाक दोघांच्या डोक्यावरून जाऊन ते चिरडले गेले. अपघाताबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आछलाराम आणि छत्राराम या दोघांनाही पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी पोलिसांना सांगितले. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. अंत्यसंस्कार मूळगावी करण्यासाठी नातेवाईक गुरुवारी मृतदेह घेऊन राजस्थानकडे रवाना झाले.
साखरपुडा झाला, लग्नाची लगबग
आछलाराम यांचा मुलगा गोविंद आणि छत्राराम यांची मुलगी मोनिका यांचे लग्न होणार आहे. त्यांचा साखरपुडा झाला. नोव्हेंबरमध्ये लग्न होणार म्हणून दोन्ही कुटुंबांकडून लगबग सुरू होती. नव्यानेच व्याही झाल्याने आछलाराम आणि छत्राराम यांनी मुलांच्या सुखी संसारासाठी अनेक स्वप्न रंगविले होते. मात्र, बुधवारी अचानक काळाने घाला घातला.
स्वीट मार्टचे स्वप्न अधुरे
आछलाराम यांचा मुलगा गोविंद यांचे मिठाईचे दुकान (स्वीट मार्ट) आहे. त्यामुळे आछलाराम आणि छत्राराम यांनी नव्याने आणखी एक स्वीट मार्ट सुरू करण्याचे नियोजन केले होते. त्यासाठी पैशांची जमवाजमव सुरू केली होती. मात्र, दोघांचे स्वीट मार्टचे स्वप्न अधुरेच राहिले.
पोलिसांनी परत केले दहा लाख रुपये
आछलाराम आणि छत्राराम हे त्यांच्या परिचयातील व्यक्तीकडून १० लाख रुपये घेऊन चिंचवडकडे जात होते. त्यांनी १० लाखांची रोकड दुचाकीच्या डिक्कीमध्ये ठेवली होती. अपघात झाल्याने दुचाकी पोलिस ठाण्यात नेण्यात आली. त्यावेळी पोलिसांना १० लाखांची रोकड मिळाली. ती रोकड पोलिसांनी चौधरी यांच्या नातेवाईकांकडे सुपूर्द केली