पिंपरीतील खळबळजनक प्रकार! वरात न आल्याने वधूने थेट गाठले पोलीस ठाणे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2022 07:45 PM2022-05-15T19:45:44+5:302022-05-15T19:45:55+5:30
वधूने आणि तिच्याकडील मंडळींनी वराकडील मंडळींची दिवसभर प्रतीक्षा करूनही कोणीही आले नाही
पिंपरी : लग्नाच्या दिवशी वधू आणि वधूकडील मंडळी मंगलकार्यालयात वराची आणि वराकडील मंडळींची प्रतीक्षा करीत होते. मात्र वर आणि वराकडील मंडळी आले नाहीत. त्यामुळे वधूने थेट पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार केली. त्यानुसार वराकडील मंडळींवर गुन्हा दाखल करण्यात आला. पिंपरी आणि पिंपळे गुरव येथील रामकृष्ण मंगल कार्यालयात ३ मार्च ते १४ मे २०२२ या कालावधीत हा प्रकार घडला.
अक्षय प्रदीप कोतवडेकर (वय २८), प्रदीप पांडुरंग कोतवडेकर (वय ६२), आदित्य प्रदीप कोतवडेकर (वय २७), वंदना प्रदीप कोतवडेकर (वय ५६, रा. मोशी), किरण सुतार (वय ५२, रा. पिंपळे गुरव) व मध्यस्थ यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. वधू असलेल्या तरुणीने याप्रकरणी शनिवारी (दि. १४) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वराकडील मंडळी हे समाजाच्या रितीरिवाजाप्रमाणे फिर्यादी तरुणीला पाहण्यासाठी आले. फिर्यादी तरुणीला त्यांनी पसंत केले. फिर्यादीसोबत साखरपुडा करून लग्नाची यादी ठरवून दिली. फिर्यादीच्या कुटुंबीयांनी यादीत ठरल्याप्रमाणे सर्व पूर्तता केली. तरी देखील वराकडील मंडळींनी वेळोवेळी वेगवेगळ्या मागण्या केल्या. शनिवारी (दि. १४) पिंपळे गुरव येथील रामकृष्ण मंगल कार्यालयात फिर्यादी तरुणीचे लग्न होणार होते. मात्र वर आणि वराकडील मंडळी लग्नासाठी मंगल कार्यालयात आले नाहीत.
फिर्यादी असलेल्या वधूने आणि तिच्याकडील मंडळींनी वराकडील मंडळींची दिवसभर प्रतीक्षा केली. मात्र ते आले नाहीत. त्यामुळे फिर्यादी तरुणीने नवरीच्या पोशाखातच पिंपरी पोलीस ठाणे गाठले. पोलिसांकडे तक्रार केली. वराकडील मंडळी लग्नासाठी हजर न राहता फिर्यादी वधू व त्यांच्या कुटुंबीयांची फसवणूक व अब्रुनुकसान केली, असे फिर्यादीत नमूद आहे. पोलीस उपनिरीक्षक शीतल गिरी तपास करीत आहेत.
वधू-वर उच्चशिक्षित
वधू असलेली फिर्यादी तरुणी आणि वर असलेला तरुण हे दोघेही इंजिनियर आहेत. यातील वर असलेला तरुण हा शासकीय सेवेत असल्याचे सांगण्यात येत आहे. तर फिर्यादी तरुणी आयटी पार्कमध्ये खासगी कंपनीत नोकरीला आहे.