ड्रायव्हरकडून विश्वासघात; मालकाच्या मृत्यूनंतर अकाऊंंटमधून काढून घेतले ३९ लाख; हिंजवडीतील प्रकार
By रोशन मोरे | Published: May 8, 2023 05:06 PM2023-05-08T17:06:39+5:302023-05-08T17:06:55+5:30
मोठ्या विश्वासाने मालकाने आपल्याकडील ड्रायव्हरला एटीएमकार्ड, चेकबूक तसेच कार, मृत्यूपत्र, सोन्याचे दागिने, लॉकरची चावी दिली होती
पिंपरी : मोठ्या विश्वासाने मालकाने आपल्याकडील ड्रायव्हरला एटीएमकार्ड, चेकबूक तसेच कार, मृत्यूपत्र, सोन्याचे दागिने, लॉकरची चावी दिली होती. मात्र, ड्रायव्हर मालकाच्या मृत्यूनंतर सर्व वस्तू गायब करत तीन अकाऊंटमधून स्वत:च्या अकाऊंटवर ३९ लाख ८७ हजार ९८४ रुपये ट्रान्सफर करून घेत फसवणूक केली. ही घटना ऑगस्ट २०१७ ते २८ एप्रिल २०२४ या कालावधीत स्नेहवृंद सोसायटी शिंदेनगर, बावधन येथे घडली. या प्रकरणी अमितवा अरुणकुमार पाल (वय ४८, रा. लुंकड गार्डन विमानगर, पुणे) यांनी रविवारी (दि.७) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी करण भाऊसाहेब पाटील (वय २६, रा. पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वडिल निवृत्त विंग कमांडर अरुण कुमार पाल यांच्या आरोपी ड्रायव्हर म्हणून कामाला होता. फिर्यादीच्या वडिलांनी त्यांच्या मृत्यूसमयी ताब्यात एटीएमकार्ड, चेकबूक, कार, मृत्यूपत्र, सोन्याचे दागिने, प्लॅटची कागदपत्रे, लॉकरची चावी आरोपीच्या ताब्यात दिली होती. मात्र, आरोपीने सर्व वस्तू गायब करत तीन अकाऊंटमधून स्वत:च्या अकाऊंटवर ३९ लाख ८७ हजार ९८४ रुपये ट्रान्सफर करून घेत फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद आहे.