IPL मधील लखनौ आणि कोलकत्ताच्या क्रिकेट मॅचवर सट्टा घेणाऱ्यांना हिंजवडीतून अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 10:04 AM2023-05-22T10:04:44+5:302023-05-22T10:05:43+5:30
ही कारवाई गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाद्वारे हिंजवडी परिसरात शनिवारी (दि.२०) करण्यात आली....
पिंपरी : लखनौ सुपर जॉइन्ट विरुद्ध कोलकत्ता नाईट राइडर्स या आयपीएल मॅचवर ऑनलाईन पध्दतीने वेगवेगळया वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने सट्टा घेणाऱ्या तब्बल नऊ जणांना पोलिसांनी अटक करत चार लाखांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाद्वारे हिंजवडी परिसरात शनिवारी (दि.२०) करण्यात आली. पोलिसांनी वैभव बाबाराम डिक्कर ( वय-२८ , मुळगाव- अकोट, अकोला) सचिन गंगाराम आजगे ( वय-२३, मुळगाव- वसमाल, धुळे) विकास कैलास लेंढे (वय २२), ओमकार बिरा भांड ( वय २० , दोघे रा. रा. पिपळगाव, दौड), आशिष निरंजण देशमुख ( वय २८, कोळीवेडी, अकोट अकोला) महेश परमेश्वर काळे ( वय ३३ वर्षे) यांना अटक केली असून राम भानु शाली, विकास रायसिंग चव्हाण, प्रकाश भगवानदास तेजवाणी यांचा शोध सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे हिंजवडी पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय बातमीवरून हिंजवडी येथे वैभव बाबाराम डिक्कर व तीन ते चार जणांकडून घेतला जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी हिंजवडी पोलीस स्टेशन हददीत सापळा रचुन आरोपींना पकडले आहे. आरोपींकडून पोलिसांनी ९० हजार रुपये किंमतीचे दोन लॅपटॉप, तीन लाख ९० हजार रुपये किंमतीचे १३ मोबाइल फोन तसेच इतर साहित्य असे चार लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.