सावधान! कस्टमर केअर, टोल फ्री क्रमांक ‘सर्च’ करताय, तर होऊ शकते फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2022 01:36 PM2022-08-04T13:36:07+5:302022-08-04T13:55:14+5:30
घरगुती विद्युत, इलेक्ट्राॅनिक उपकरणे दुरुस्तीच्या माध्यमातून घातला जातोय गंडा
नारायण बडगुजर
पिंपरी : घरगुती विद्युत उपकरणे, इलेक्ट्राॅनिक वस्तूंच्या दुरुस्तीसाठी संबंधित कंपन्यांचे टोल फ्री क्रमांक आहेत. काही जणांनी बनावट कस्टमर केअर सुरू करून त्यांचे टोल फ्री क्रमांक इंटरनेटवर दिले आहेत. त्यामुळे इंटरनेटवर सर्च केल्यास मूळ कंपनीऐवजी अनेक जण बनावट टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधतात. यातून त्यांची फसवणूक होते. त्यामुळे अशा बनावट टोल फ्री क्रमांकापासून सावध रहात नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
नामांकित कंपन्यांच्या फ्रीज, टिव्ही, वाॅशिंग मशिन यासह विद्युत उपकरणे घरोघरी मोठ्या प्रमाणात वापरले जातात. यात काही उपरकरणांमध्ये बिघाड होतो. त्यामुळे ग्राहक संबंधित कंपनीच्या कस्टमर केअरशी संपर्क साधण्यासाठी इंटरनेटवर कंपनीची वेबसाईट सर्च करतात. यावेळी मूळ कंपनीसह बनावट कंपनीच्या नावाच्या वेबसाईट देखील दिसून येतात. यात काही सुरुवातीच्या वेबसाईटच्या लिंक जाहिरात म्हणून इंटरनेटवर दिसून येतात. त्यानंतर संबंधित नामांकित मूळ कंपनीची वेबसाईट, टोल फ्री क्रमांक आणि कस्टमर केअर आदींबाबतची लिंक इंटरनेटवर दिसून येते. मात्र, सुरुवातीच्या काही लिंकवर ग्राहकांकडून क्लिक केले जाते. त्यामुळे बनावट कस्टमर केअरच्या संपर्कात ते येतात. ग्राहकाची तक्रार नोंदविल्यासारखे करून नाव, पत्ता आदी माहिती घेतली जाते. त्यानंतर संबंधित पत्त्यावर टेक्निशियन पाठविला जातो.
पावतीही बनावटच
संबंधित टेक्निशियन बिघाड झालेले उपकरण दुरुस्त झाल्यासारखे करतो. बनावट कंपनीचे साहित्य वापरून ते मूळ नामांकित कंपनीचे असल्याचे भासवितो. त्यासाठी मोठी रक्कम संंबंधित ग्राहकाकडून घेतो. तसेच मूळ कंपनीचा टेक्निशियन असल्याचे सांगून उत्तम ‘सेवा’ दिल्याचे सांगून त्याची बनावट पावती देखील देतो. त्यामुळे संबंधित ग्राहकाला त्याबाबत संशय येत नाही. मात्र, काही दिवसांतच उपकरण पुन्हा नादुरुस्त होते. फसवणूक झाल्याचे त्यानंतर निदर्शनास येते. त्यावेळी संबंधित व्यक्तीने कस्टमर केअर किंवा टेक्निशियन यांच्याशी संपर्क साधला असता, प्रतिसाद मिळत नाही.
हॅलो, कस्टमर केअरमध्ये आपले स्वागत आहे.
इंटरनेटवर सर्च केल्यानंतर बनावट कस्टमर केअर कंपनीच्या वेबसाईटवरून टोल फ्री क्रमांकावरून संपर्क साधल्यास समोरील व्यक्ती देखील प्रशिक्षित कस्टमर केअर सेंटरमधील कर्मचाऱ्यांप्रमाणे ग्राहकांशी संवाद साधतात. हॅलो, कस्टमर केअरमध्ये आपले स्वागत आहे. काय मदत पाहिजे आहे, असे म्हणून ग्राहकाचा विश्वास संपादन केला जातो. त्यामुळे ग्राहकही त्यांना माहिती देतात.