सावधान! अंधारात मोबाइल पाहाल तर डोळे घालवून बसाल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 12:13 PM2022-12-16T12:13:33+5:302022-12-16T12:14:34+5:30
लहान मुलांबाबत काय काळजी घ्याल?...
पिंपरी : अलीकडे प्रत्येकाच्या हातामध्ये स्मार्ट फोन आहे. मात्र, या फोनच्या अतिरिक्त वापरामुळे आरोग्यावर परिणाम होत असल्याचे अनेक संशोधनातून समोर आले आहे. तसेच रात्रीच्या वेळी अंधारामध्ये मोबाइल बघितल्याने थेट डोळ्यांवर त्याचा परिणाम होत आहे.
अंधारात मोबाइल नकोच
झोपण्यापूर्वी अंधारात मोबाइल पाहणे हानिकारक आहे. मोबाइलच्या उजेडाद्वारे ब्ल्यू लाइट बाहेर पडत असते. ही ब्ल्यू लाइट थेट आपल्या डोळ्यातील रेटिना नावाच्या पडद्यावर पोहोचून हानी पोहोचते. त्यामुळे नजर कमी होण्याची शक्यता असते.
मोबाइल वापरताना काय काळजी घ्याल?
मोबाइल वापरताना शक्यतो तो चेहऱ्यासमोर लांब धरावा. तसेच रात्रीच्या वेळी अंधारामध्ये मोबाइलचा वापर करू नये. खूप आवश्यक काम असेल तर रात्रीच्या वेळी रीडिंग मोड सुरू करून फोन वापरावा. मात्र तरीही जास्त वेळ त्याचा वापर करू नये. तसेच रात्री झोपताना मोबाइल उशी खाली तसेच शरीराजवळ घेऊन झोपू नये.
लहान मुलांबाबत काय काळजी घ्याल?
लहान मुलांना शक्यतो मोबाइल देणे टाळले पाहिजे. ज्या लहान मुलांना मोबाइलवर अभ्यास आहे त्यांच्यासाठी मोबाइल दूर ठेवून ते अभ्यास करतील याकडे पालकांनी लक्ष दिले पाहिजे. तसेच मुलांनी मोबाइलवरील गेमपेक्षा मैदानी खेळामध्ये जास्त लक्ष दिले पाहिजे.
डोळ्यांना धोका काय?
स्मार्ट फोनमुळे सर्वात जास्त डोळ्यांचे नुकसान होते. स्मार्ट फोनच्या अतिवापरामुळे झोपेची समस्या येते. रात्री उशिरापर्यंत मोबाइल बघत राहिल्यास लवकर झोप येत नाही. त्यामुळे डोळ्यांना सूज येणे, डोळे लाल होणे अशा तक्रारी भेडसावतात.
...तर नेत्रतज्ज्ञांना दाखवा
मोबाइलच्या अतिवापरामुळे डोळे लाल होणे, सूज येणे, डोळ्यांमधून सतत पाणी येणे असे आजार जडतात. अशी लक्षणे आढळल्यास परस्पर मेडिकलमधून औषधे घेऊन त्याचा वापर करू नये, तर तात्काळ नेत्रतज्ज्ञांना दाखवून तपासणी करून घ्यावी.
रात्रीच्या वेळी अंधारामध्ये मोबाइलचा वापर करणे घातक आहे. मोबाइलचा लाइट जास्त असेल तर त्याच्या डोळ्यांच्या पडद्यावर परिणाम होतो. त्यामुळे मोबाइलचा लाइट कमी करून वापर करावा.
- डॉ. रूपाली महेशगौरी, विभागप्रमुप, नेत्र विभाग