‘सिम व्हेरिफिकेशन पेंडिंग’ असा मेसेज आल्यास सावधान! फसवणूक होण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2021 06:08 PM2021-06-03T18:08:16+5:302021-06-03T18:08:46+5:30
सोशल मीडियावरून फसवूणक करण्याचे प्रकार सर्रास घडत असतानाच माहिती विचारून ऑनलाइन पैसे ट्रानफर करून गंडा घातला जात आहे....
पिंपरी : कोरोना महामारी व लॉकडाऊन दरम्यान ऑनलाइन व्यवहार वाढले आहेत. त्याचाच गैरफायदा सायबर चोरट्यांनी घेतला आहे. सिमकार्डचे व्हेरिफिकेशन पेंडिंग आहे, अपडेट करून घ्या, नाहीतर २४ तासांत सीम ब्लॉक होईल, असा मेसेज करून ॲप डाऊनलोड करायला सांगतात किंवा माहिती विचारून बँकेच्या खात्यातून पैसे काढून घेतात. त्यामुळे मोबाईलधारकांनी यापासून सावधान राहिले पाहिजे.
सोशल मीडियावरून फसवूणक करण्याचे प्रकार सर्रास घडत असतानाच माहिती विचारून ऑनलाइन पैसे ट्रानफर करून गंडा घातला जात आहे. एटीएम, डेबीट व क्रेडीट कार्डची माहिती विचारून असे प्रकार मोठ्या संख्येने घडले आहेत. त्यानंतर आता सायबर चोरट्यांनी सिमकार्डच्या माध्यमातून असा फ्राॅड करण्याची पद्धत अवलंबली आहे. तुमच्याकडील सिमकार्ड जुने झाले आहे, ते अपडेट करून घ्या, ते ऑनलाइन करून घेता येईल, तुम्ही माहिती सांगा, त्यानंतर ओटीपी क्रमांक येईल तो सांगा, असे म्हणून चोरटे मोबाइलधारकाला बोलण्यात गुंतवून माहिती काढून घेतात. तसेच एक कोड तुमच्या मोबाइलवर पाठवला आहे, तो स्कॅन करून द्या, त्यानंतर तुमचे सिमकार्ड अपडेट होईल, अन्यथा ते २४ तासांत ब्लॉक होईल, सांगून विश्वास संपादन करून कोड स्कॅन करण्यास सांगितले जाते. त्यानंतर मोबाइल धारकाच्या बँक खात्यातून रक्कम ऑनलाइन ट्रान्सफर होऊन फसवणूक होते.
ॲप डाऊनलोड करण्यापूर्वी सावधान
मोबाइलवर मोठ्या प्रमाणात मेसेज येत असतात. त्यातील काही मेसेज ॲप संदर्भात असतात. आमच्या ऑनलाइन सर्व्हेमध्ये तुम्ही विजेता ठरला आहात, तुमचे बोनस पॉईंट मिळवण्यासाठी सोबत दिलेल्या लिंकवर जाऊन ॲप डाऊनलोड करा, असे मेसेज येतात. असा कोणताही सर्व्हे झालेला नसतो किंवा बोनस पॉईंटही नसतात. त्यामुळे सतर्क राहिले पाहिजे.
असा कॉल, मेसेज आल्यास रहावे सतर्क
१) सायबर चोरटे काही वेळेस कॉल करतात. बँकेतून बोलतोय, तुमची माहिती सांगा, नाहीतर तुमचा नंबर ब्लॉक होईल, असे सांगितले जाते. अशा वेळी घाबरून न जाता त्यांना कोणताही प्रतिसाद देऊ नये. तसेच आपले खाते असलेल्या बँकेच्या शाखेशी लँडलाइनवर संपर्क साधावा किंवा तेथील परिचयाच्या व्यक्तीला कॉल करून खातरजमा करून घ्यावी.
२) बीएसएनएल कंपनीतून बोलतोय, नवीन प्लॅन आला आहे. तुम्ही तो प्लॅन घ्या, त्यासाठी सीम किंवा नंबर बदलण्याची गरज नाही. काही माहिती दिली तर आम्ही आताच तो प्लॅन तुमच्या सीमवर ॲक्टीव करून देऊ शकतो, तुम्ही माहिती द्या, असे सांगून चोरटे माहिती घेतात. त्या आधारे मोबाइलधारकाला लाखो रुपयांचा गंडा घातला जातो.
३) तुमचे आधार आणि पॅन कार्ड सीमकार्डला कनेक्ट नाहीत. ते अपडेट करून घ्यावे लागेल. त्यासाठी आधारकार्ड, पॅनकार्ड नंबर सांगा. तसेच एटीएम कार्डचीही माहिती त्यासाठी लागणार आहे, असे सांगून बँकेच्या खात्याची माहिती घेतली जाते. त्याव्दारे ऑनलाइन पैसे काढून घेतले जातात.
अशी घ्या काळजी.....
सीमकार्ड ब्लॉक करण्याबाबत मेसेज किंवा कॉल आल्यास त्याला प्रतिसाद देऊ नये. संबंधित कंपनीचे बिल अदा न केल्यास सेवा बंद होते. तसेच काही कागदपत्रांची पुर्तता करायची राहिल्यास देखील सेवा बंद होते. त्यासाठी संबंधित कंपनीच्या गॅलरीत किंवा अधिकृत सेंटरला जाऊन त्याबाबत खातरजमा करून घ्यावी.
इतर कोणालाही माहिती देऊ नये.
चॅटिंग करून पैशांची मागणी होत असल्यास ऑडिओ व व्हिडीओ कॉल करून संबंधित व्यक्ती तीच आहे का, याची खात्री करावी. तोपर्यंत चॅटिंग करणा-यावर किंवा कॉल करणा-यावर विश्वास ठेवू नका. तसेच संबंधित कंपनीच्या अधिकृत केंद्रांवर याबाबत माहिती घ्यावी.
- डॉ. संजय तुंगार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर सेल
सिमकार्ड फ्रॉड
२०२० - ३
२०२१ (मे) – ३