Pimpri Chinchwad: खबरदार, गणेशोत्सव काळात विघ्न आणाल तर थेट तुरुंगात जाल!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2023 12:43 PM2023-09-04T12:43:47+5:302023-09-04T12:44:13+5:30
कायद्याचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येणार आहे...
पिंपरी : गणेशोत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी संशयितांवर प्रतिबंधात्मक कारवाया सुरू केल्या आहेत. गेल्या महिनाभरात पिंपरी-चिंचवडपोलिस आयुक्तालयांतर्गत अशा अनेकांवर प्रतिबंधात्मक कारवाई झाली. दोन आठवड्यांत आणखी काही संशयितांवर कारवाया होणार आहेत. त्यामुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. कायद्याचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येणार आहे.
गणेशोत्सव काळात आगमन मिरवणूक आणि विसर्जन मिरवणूक वेळेत पार पाडण्यासाठी पोलिसांना विशेष खबरदारी घ्यावी लागते. याशिवाय वाहतूक सुरळीत ठेवणे, मंडळांचे देखावे, त्याचे सोशल मीडियातील पडसाद, काही मंडळांमधील आपापसातील संघर्ष, आवाज मर्यादेचे उल्लंघन यावर लक्ष ठेवावे लागते. त्या अनुषंगाने पोलिसांनी गेल्या महिन्यापासूनच पूर्वतयारी सुरू केली. कायदा सुव्यवस्था बिघडवण्यास कारणीभूत ठरणाऱ्या संशयितांवर प्रतिबंधात्मक कारवाया होत आहेत. सीआरपीसी आणि मुंबई पोलिस कायद्यानुसार संशयितांना नोटिसा देणे, तात्पुरते हद्दपार करणे, चांगल्या वर्तनाचे प्रतिज्ञापत्र घेणे, अशा उपाययोजना सध्या केल्या जात आहेत.
त्रास देणाऱ्या मंडळांची यादी तयार
वाहतुकीला अडथळा करणे, मोठ्या आवाजाच्या ध्वनी यंत्रणांचा वापर करणे, मिरवणुकीत मुद्दाम थांबून वेळ घालवणे, पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करणे, अन्य मंडळांना दमदाटी करणाऱ्या मंडळांची यादी पोलिसांनी तयार केली आहे. त्या मंडळांवर पोलिसांची नजर राहणार आहे.
सराईतांवर कारवाया
विविध गुन्ह्यांमधील सराईत गुन्हेगार, मंडळांना वारेमाप पैसा पुरवणारे प्रायोजक, हद्दपार गुन्हेगार यांच्यासह मटका, जुगार चालवणारे आणि बेकायदेशीरपणे मद्याची विक्री करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाया केल्या जाणार आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून मंडळांनी विधायक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा. चांगल्या कामांचे समाजाकडून नेहमीच कौतुक होते. अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी प्रतिबंधात्मक कारवाया केल्या जात आहेत.
- विनय कुमार चौबे, पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड