चिंचवडमधील मोरया गोसावींच्या श्री मंगलमूर्तींची भाद्रपद यात्रा बुधवारपासून

By विश्वास मोरे | Published: September 2, 2024 07:08 PM2024-09-02T19:08:15+5:302024-09-02T19:09:00+5:30

श्री मंगलमूर्तींना पालखीतून मोरगाव येथे नेण्याची ही परंपरा सुमारे गेली ५२५ वर्षांपेक्षा अधिक काळ अविरत सुरु

Bhadrapad Yatra of Shri Mangalmurthy of Morya Gosavi in Chinchwad from Wednesday | चिंचवडमधील मोरया गोसावींच्या श्री मंगलमूर्तींची भाद्रपद यात्रा बुधवारपासून

चिंचवडमधील मोरया गोसावींच्या श्री मंगलमूर्तींची भाद्रपद यात्रा बुधवारपासून

पिंपरी: चिंचवड येथील श्रीमन् महासाधू मोरया गोसावी महाराज प्राप्त श्री मंगलमूर्तींची भाद्रपद पालखी यात्रा येत्या बुधवारपासून सुरू होत आहे. यात्रेचा समारोप शुक्रवार, दिनांक १३ सप्टेंबरला होईल, अशी माहिती देवस्थानचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव यांनी सोमवारी दिली.

चिंचवड येथील महान गाणपत्य श्रीमन् महासाधू श्रीमोरया गोसावी महाराज दरमहा श्री मयूरेश्वराच्या दर्शनास मोरगाव येथे जात असत. त्यांनी सन १५६१ साली चिंचवड येथे पवना नदीच्या काठावर संजीवन समाधी घेतली. श्री मोरया गोसावी महाराजांना वयाच्या ११७ व्या वर्षी सन १४८९ मध्ये श्री मयुरेश्वराची तांदळामूर्ती श्री क्षेत्र मोरगाव येथील कऱ्हा नदीच्या पात्रात, गणेशकुंडात प्राप्त झाली. ती प्रसाद्मूर्ती घेऊन भाद्रपद महिन्यात श्री मंगलमूर्तींना पालखीतून मोरगाव येथे नेण्याची ही परंपरा सुमारे गेली ५२५ वर्षांपेक्षा अधिक काळ अविरत चालू आहे.

असा असेल सोहळा 

पालखी प्रस्थानानिमित्त मोठी मिरवणूक काढण्यात येणार आहे. मिरवणुकीत अश्व अग्रभागी असतील. तसेच पुण्यातील नामवंत श्रीगजलक्ष्मी ढोल पथक यामध्ये सहभागी होणार आहे. बुधवारी दुपारी बारा वाजता पालखी श्री मंगलमूर्ती वाडा येथून श्री क्षेत्र मोरगावकडे प्रस्थान करणार आहे. श्री मंगलमूर्ती वाडा ते समाधी मंदिर, गांधीपेठ, पावर हाउस चौक  ( पिंपरी-चिंचवड लिंकरोड ) मार्गे भाटनगर, मुंबई-पुणे महामार्ग, खडकी, वाकडेवाडी, शनिवारवाडा, लक्ष्मीरस्त्याने जाऊन पुण्यातील एकनाथ मंगल कार्यालयात पालखीचा मुक्काम असेल. गुरुवारी ( ता. ५ ) पहाटे साडेचार वाजता पालखी प्रस्थान करेल. एकनाथ मंगल कार्यालयातून भवानीपेठ, रामोशी गेट, भैरोबा नाला, दिव्य वाटिका आश्रम, दिवेघाट, सासवड बाजारातून कऱ्हाबाई मंदिरात दुसरा मुक्काम असेल. पालखी शुक्रवारी (ता. ६) सकाळी मंदिरातून शिवरी, रासकर मळ्याच्या दिशेने निघेल. श्री क्षेत्र जेजुरी, मावडी, ढोले मळामार्गे मोरगाव येथे रात्री नऊ वाजता पालखी पोहोचेल. त्यानंतर शनिवार (७ सप्टेंबर) आणि रविवारी (८ सप्टेंबर) पालखीचा मुक्काम मोरगाव येथेच असेल. ९ सप्टेंबरपासून पालखीचा परतीचा प्रवास सुरू होईल. श्री क्षेत्र जेजुरी, श्री कऱ्हाबाई मंदिर, दिव्य वाटिका आश्रम वडकी या ठिकाणी मुक्काम करीत १३ सप्टेंबरला पालखी पुन्हा चिंचवड येथील मंदिरात येईल.

Web Title: Bhadrapad Yatra of Shri Mangalmurthy of Morya Gosavi in Chinchwad from Wednesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.