श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर माघ दशमीला भक्तिसागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 12:48 AM2019-02-20T00:48:28+5:302019-02-20T00:48:51+5:30
अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता : ग्रंथदिंडी, प्रवचन, कीर्तन
देहूरोड : श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर माघ शुद्ध दशमी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दशमी सोहळ्यास भक्तिसागर लोटला होता. अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता झाली. श्री विठ्ठल-रखुमाई संत तुकाराममहाराज भंडारा डोंगर ट्रस्टच्या माध्यमातून भंडारा डोंगरावर अखंड हरिनाम सप्ताह सुरू होता. सोहळ्याची सांगता नुकतीच झाली. भाविकांच्या उपस्थितीने डोंगर फुलून गेला होता. काल्याचे कीर्तन झाल्यानंतर हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
महादू नेवाळे, महेंद्र हुलावळे यांचा सत्कार केला. भागवताचार्य डॉ. विकासानंदमहाराज मिसाळ यांनी काल्याच्या कीर्तन केले.
‘कृष्णाचिया सुखे भूक नाही तहान सदा समाधान सकळांचे’ या संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर निरुपण करीत हभप मिसाळ महाराजांनी गोकुळातील भगवंताच्या विविध लीला अनेक रुपकांमधून, दृष्टान्तांमधून सांगितल्या. तुकोबारायांच्या अभंग गाथेत वेद प्रकट झाला. जो वेद व्यासापासून निर्माण झाला ते चारही वेद व वेदांचे विवरण तुकोबांच्या गाथेत आहे. म्हणूनच गाथेला पंचम वेद समजले जाते, असे महाराजांनी सांगितले. ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद म्हणाले, की श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर भव्य मंदिर व्हावे ही महाराष्ट्रातील लाखो भाविकांची इच्छा आहे. अक्षरधाम मंदिराप्रमाणेच स्टील, सिमेंट न वापरता राजस्थान येथून सुवर्ण तांबूस दगड घडवून आणून मंदिराचे काम भंडारा डोंगरावर सुरू आहे. हे मंदिर लवकरात लवकर पूर्णत्वास जावे यासाठी मदत करावी. तसेच राज्यातील श्री संत तुकोबारायांचे सर्वांत सुंदर असे मंदिर होणार आहे. या वेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार बाळा भेगडे, माजी आमदार दिगंबर भेगडे, संत तुकाराम सहकारी कारखान्याचे अध्यक्ष बापूसाहेब भेगडे आदी उपस्थित होते. तळेगाव माळवाडी येथील स्वाती किसान दाभाडे हिचा महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मुलींमध्ये प्रथम आल्याबद्दल सन्मान करण्यात आला. या वेळी महाप्रसादाचे वाटप झाले.
वारकऱ्यांच्या फुगड्या : विठुरायाचा जयघोष
४गाथा पारायणाचा समारोप नानामहाराज तावरे यांनी आरती करून केला. ज्ञानोबा माऊली-तुकाराम असा एकच नामघोष, गजर करीत वारकºयांनी फुगड्यादेखील मोठ्या आनंदाने घातल्या. ही ग्रंथदिंडी परत प्रदक्षिणा करून मुख्य मंडपात आली होती. या वेळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. त्याचा लाभ परिसरातील नागरिकांनी घेतला.
४‘कृष्णाचिया सुखे भूक नाही तहान सदा समाधान सकळांचे’ या संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर निरुपण करीत हभप मिसाळ
महाराजांनी गोकुळातील भगवंताच्या विविध लीला अनेक रुपकांमधून, दृष्टान्तांमधून सांगितल्या. तुकोबारायांच्या अभंग गाथेत वेद प्रकट झाला. जो वेद व्यासापासून निर्माण झाला ते चारही वेद व वेदांचे विवरण तुकोबांच्या गाथेत आहे. म्हणूनच गाथेला पंचम वेद समजले जाते, असे महाराजांनी सांगितले.