भोसरीत दोघांची ऑनलाइन फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 05:46 PM2017-07-30T17:46:21+5:302017-07-30T17:46:30+5:30
दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये भोसरीतील दोघांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे.
पिंपरी, दि. 30 - दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये भोसरीतील दोघांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. एकाला हॉलिडे पॅकेजचे आमिष दाखवून २० हजाराला तर दुस-यास एटीएमकार्ड संबंधी गोपनीय माहिती घेऊन १५ हजारांना गंडा घातला आहे. पोलिसांकडे २९ जुलैला फिर्याद दाखल झाली आहे.
भोसरी पोलिसांनी दिलेलया माहितीनुसार फिर्यादी सुहास महांबरे यांना राकेश शर्मा व अन्य दोन जणांनी मोबाईलवर संपर्क साधून हॉलिडे पॅकेजची माहिती दिली. ऑनलाइन २० हजार रूपये भरण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादीने ऑनलाइन रक्कम भरली. मात्र कसलेही हॉलिडे पॅकेज त्यांना मिळाले नाही. फसवणूक झाली म्हणुन त्यांनी राकेश वर्मा व अन्य दोन अज्ञात आरोपींविरोधात फिर्याद दिली आहे.
दुस-या घटनेत फिर्यादी महेंद्र पाल यांना २९ जुलैला मोबाईलवरून संपर्क साधून अज्ञात भामट्यांनी एटीएम कार्डसंबंधी माहिती सांगण्यास भाग पाडले. बँकेचा अधिकारी बोलत असल्याचे सांगून आपले एटीएम कार्ड ब्लॉक झाले आहे, अशी भीती दाखवून एटीएम कार्डची माहिती घेतली. फिर्यादीच्या खात्यातून परस्पर १५ हजार रूपये दुस-या खात्यात वर्ग झाले. आपल्या बँक खात्याची गोपनीय माहिती कोणाही अनोळखी व्यक्तीला देऊ नका, फसवणूक होण्याची शक्यता असते. असे वांरवार सूचित करूनही ऑनलाइन फसवणूक होण्याच्या घटना घडत आहेत. नागरिकांनी सतर्कता दाखवली तरच त्यावर नियंत्रण येऊ शकते, असे पोलिसांचे म्हणणे आहे.