मावळ तालुक्यात भातलागवडी जोमात
By Admin | Published: July 2, 2017 02:26 AM2017-07-02T02:26:53+5:302017-07-02T02:26:53+5:30
मावळ तालुक्यात सध्या भाताची रोपे लागवडीच्या कामांची धामधूम सुरू आहे. चार-पाच दिवसांपासून या भागात पावसाने चांगलीच हजेरी
लोकमत न्यूज नेटवर्क
तळेगाव दाभाडे : मावळ तालुक्यात सध्या भाताची रोपे लागवडीच्या कामांची धामधूम सुरू आहे. चार-पाच दिवसांपासून या भागात पावसाने चांगलीच हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. सध्या पावसाचा जोर असल्याने लावणीच्या कामांना विलंब होऊ नये, यासाठी येथील शेतकरी प्लॅस्टिक कागद, पोते, इरले-घोंगड्याचा वापर करून भात लावणीची कामे करताना दिसत आहेत.
मावळ तालुक्यात खरीप हंगामात भात हे मुख्य पीक शेतकरी घेतात. या भागातील शेतकरी दरवर्षी नदीच्या पाण्यावर रोपवाटिका तयार
करतात. चार-पाच दिवसांपूर्वी मुसळधार पाऊस झाल्याने रोपे लागवडीसाठी शेतात पाणी आल्याने लागवड सुरू करण्यात आली.
वाढत्या औद्योगिकीकरणामुळे मुळशी तालुक्यात भातलागवडीसाठी मजूरच मिळत नाहीत. काही गावांमध्ये एकमेकांमध्ये अदलाबदली करून भातलागवड सुरू केली आहे. काही परराज्यांतील बांधकाम मजुरांना शेतीकामासाठी न्यावे लागत असल्याचे चित्र दिसत आहे.
अधिक उत्पन्न वाढीसाठी व मशागतीसाठी चारसूत्री पद्धत अत्यंत योग्य असल्याने, रोग व किड्यांचे नियंत्रण करणे सोपे जाते. त्याचबरोबर सर्व रोपांना योग्य प्रकारे सूर्यप्रकाश मिळतो. हवा खेळती राहत असल्याने उत्पन्नात भरघोस वाढ होत आहे. शेतकरी सध्या पारंपरिक पद्धत सोडून चारसूत्री भातलागवडीकडे वळलेला दिसत आहे.
वारंवार कृषी अधिकाऱ्यांकडून सल्ला घेतला जात आहे. तसेच शेतकरी एकमेकांना मदत करत असल्याने भात रोपांची लागवड केली जात आहे. तसेच आधुनिक चारसुत्री पद्धतीचा अवलंब केला जात असल्याने समाधान व्यक्त होत आहे.
संततधार पावसाने भातरोपे जोमात
वडगाव मावळ : या नक्षत्रात निसर्गाच्या अवकृपेमुळे पावसाने दडी मारल्याने भातपिकाच्या दुबार पेरणीचे संकट या भागातील शेतकऱ्यावर ओढवले असते. ठिकठिकाणी भाताची रोपे उगवली होती. ती पावसाअभावी पिवळी पडत चालली होती. तरी, बळीराजाला वरुणराजने चांगली साथ दिली; त्यामुळे भातरोपे जोमात आली आहेत. त्यामुळे शेतकरी सुखावला आहे. भातरोपे मोठ्या डौलात वाढत आहेत.