भाऊसाहेब भोईर, विनोद नढे यांची ‘घरवापसी’
By admin | Published: November 28, 2015 12:39 AM2015-11-28T00:39:36+5:302015-11-28T00:39:36+5:30
काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर आणि महापालिकेचे विरोधी पक्षनेते विनोद नढे यांच्यावरील निलंबनाची कारवाई पक्षाने अखेर मागे घेतली आहे.
पिंपरी : काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर आणि महापालिकेचे विरोधी पक्षनेते विनोद नढे यांच्यावरील निलंबनाची कारवाई पक्षाने अखेर मागे घेतली आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी गुरुवारी रात्री उशिरा हा निर्णय घेतला. भोईर, नढे यांच्या ‘घरवापसी’मुळे शहर काँगे्रसला ‘अच्छे दिन’ येतील, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे.
महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदाच्या निवडीवरून काँग्रेसमध्ये गेल्या काही महिन्यांपासून अंतर्गत कलह सुरू झाला होता. त्यावरून काँग्रेसचे नगरसेवकही भोईर आणि शहराध्यक्ष सचिन साठे अशा दोन गटांत विभागले गेले. या सर्व घडामोडीनंतर तत्कालीन प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी भाऊसाहेब भोईर आणि विरोधी पक्षनेते विनोद नढे यांना फेब्रुवारी २०१५ मध्ये पक्षातून निलंबित करण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर काँगे्रसची ताकत वाढविण्यासाठी पक्षनेतृत्वाने शहरात लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून काँगे्रसचे नेते शहरातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. गट-तट न ठेवता पक्षाचा विस्तार व्हावा यासाठीही जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे दहा महिन्यांनंतर भोईर व नढे यांचे निलंबन मागे घेण्याचा निर्णय पक्षाने घेतला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी गुरुवारी भोईर व नढे यांचे निलंबन मागे घेतले आहे. (प्रतिनिधी)