भिडे गुरुजींनी धारकरी होण्याऐवजी टाळकरी व्हावे म्हणजे तुकोबा समजेल : संभाजीमहाराज देहूकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 09:08 PM2018-07-11T21:08:11+5:302018-07-11T21:18:28+5:30
पुण्यात संभाजी भिडे यांनी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांपेक्षा मनु पुढे आहे, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावर वारकरी संप्रदायातून टीका होत असून संत तुकाराम महाराज यांचे वंशज संभाजी महाराज देहूकर यांनी भिडे यांच्यावर टीका केली आहे.
पिंपरी : संभाजी भिडे यांनी धारकरी होण्यापेक्षा टाळकरी व्हावे, म्हणजे त्यांना तुकोबाराय कळतील. कोण पुढे कोण मागे असला दांभिक मनुवादी विचार वारकरी संप्रदायाला मान्य नाही. गाढव शृंगारिले कोडे, काही केल्या नव्हे घोडे, त्याचे भुंकेने न राहे, स्वभावाशी वरील काय, तुका म्हणे स्वभाव कर्म, काही केल्या न सुटे धर्म...भिडे यांची भीड भाड ठेवण्याएवढे आम्ही नामर्द नाही, अशी टीका देहूतील संत तुकाराम महाराज देवस्थानचे माजी विश्वस्त संभाजीमहाराज देहूकर यांनी केली आहे.
पुण्यात संभाजी भिडे यांनी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांपेक्षा मनु पुढे आहे, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावर वारकरी संप्रदायातून टीका होत असून संत तुकाराम महाराज यांचे वंशज संभाजी महाराज देहूकर यांनी भिडे यांच्यावर टीका केली आहे. देहूकरमहाराज म्हणाले, तुकोबारायांचा रोखठोक भक्तीवाद देखील आम्हाला माहिती आहे. भिडे हे संतद्रोही आणि पाखंडी आहेत. याच जाणिवेतून अशा लोकांचे खंडण आणि मंडण करण्यासाठी तुकोबारायांनी अभंग लिहून ठेवला आहे. धर्माचे पालन, करणे पाखंड खंडन, तीक्ष्ण़ उत्तरे, हाती घेऊनी बाण फिरे असे तुकोबारांयाचे शुद्ध विचार जगणारे आणि जागविणारे आम्ही वारकरी आहोत. भिडे गुरुंजीसारखा सांप्रत मंबाजी-दंभाजी होऊन वारकरी संप्रदायाच्या अस्मितेचा छळ करत आहे. आपल्या अज्ञानाचे प्रदर्शन मांडले आहे. त्यापूर्वी ज्ञानोबा तुकोबारायांच्या अभंगाचे दर्शन घेतले असते तर नाठाळ बुद्धी सोज्वळ झाली असती. मनुचे साक्षात्कारी वारसदार म्हणून घेणाऱ्या गुरूजींपी संतांच्या अभंगमय संतांच्या विचारांना वारकरी होऊन स्पर्श केला असता तर अशी नाठाळ आणि बुद्धीभेद करणारी असभ्य वक्तव्ये केली नसती. केवळ एका समाजाच्या भल्यासाठी मनुंनी जातीभेद वर्णभेद, लिंगभेद आणि धर्मभेद केला. कर्मकांडाच्या भिंती उभ्या करून वेदाला आणि देवाला कोंडून ठेवले. त्या सगळ्या कणखर भिंती उखडून टाकण्यासाठी ज्ञानोबारायांनी पसायदान , ज्ञानेश्वरी लिहिली. विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ असा आकाशाऐवढा व्यापक भक्तीवाद तुकोबांनी जगापुढे ठेवला. गुरुजींनी वारकºयांची क्षमा मागून प्रायश्चित्त करावे.