भीमराया... तुला ही मानवंदना

By admin | Published: April 15, 2017 03:56 AM2017-04-15T03:56:05+5:302017-04-15T03:56:05+5:30

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त पिंपरी येथील बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायांनी हजेरी लावली.

Bhimraya ... you only salute | भीमराया... तुला ही मानवंदना

भीमराया... तुला ही मानवंदना

Next

पिंपरी : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त पिंपरी येथील बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायांनी हजेरी लावली. ‘जय भीम’ चा नारा देत अनुयायी, संस्था-संघटना, राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी पुष्पहार अर्पण करण्यासाठी सकाळपासूनच हजेरी लावली होती. तसेच महानगरपालिकेच्या वतीने सकाळी बाबासाहेबांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली.
शुभ्रवस्त्र परिधान करून अबालवृद्धांनी केलेली गर्दी लक्ष वेधून घेत होती. पुतळा परिसरात यंदा पुस्तक विक्री करणाऱ्या स्टॉलची संख्या लक्षणीय पहायला मिळाली. यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पाली विभागाचा स्टॉलही लावण्यात आला होता. गौतम बुद्धांनी दिलेले ज्ञान बहुतांश पाली भाषेतच आहे. या ज्ञानाचा आणि भाषेचा प्रसार व्हावा, या उद्देशाने स्टॉल लावण्यात आल्याचे संयोजकांनी सांगितले. महापालिकेच्या वतीने आयोजित केलेल्या महोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रमाला नागरिकांनी गर्दी करून उत्स्फूर्त दाद दिली. बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित ग्रंथांची खरेदी करण्यावर नागरिकांनी भर दिला. तसेच शिवाजीमहाराज, म. फुले, भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आकर्षक प्रतिमा आणि मूर्ती खरेदीसाठी मांडण्यात आल्या होत्या.
उन्हाचा तडाखा बसत असल्याने अनुयायांची गैरसोय होऊ नये, यासाठी विविध संघटना आणि राजकीय पक्षांच्या वतीने ठिकठिकाणी पाणपोईची व्यवस्था करण्यात आली होती. पोलिसांच्या वतीने परिसरात चोख बंदोबस्त ठेवला होता. (प्रतिनिधी)

अनोखे अभिवादन : एका वही-पेनचे दान
वही-पेन संकलन समितीच्या वतीने यंदा अनुयायांना अनोखे अभिवादन करण्याचे आवाहन करण्यात येत होेते. या आवाहनाला प्रतिसाद देत पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांकडून एक वही आणि एक पेन दान करण्यात येत होते. गरिबांच्या मुलांना शिक्षणासाठी मदत व्हावी, या हेतूने या वही, पेनचे संकलन करण्यात येत आहे, असे समितीच्या वतीने सांगण्यात आले. या अभियानांतर्गत एका दिवसात सुमारे ७० हजार वह्यांचे संकलन करण्यात आले आले.

Web Title: Bhimraya ... you only salute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.